गडचिरोली पोलिसांनी गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरील माओवादी कॅम्प केला उद्ध्वस्त

134

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ७ : माओवाद्यांना सातत्याने नामोहरम करत आलेल्या गडचिरोली पोलिसांनी पुन्हा एकदा माओवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त केला आहे.

कसनसूर – चातगाव, टिपागड, दलम, छत्तीसगडच्या मोहल्ला मानपूर दलम आणि औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे मौजा भिमनखोजी, नारकसा (पोस्टे गॅरापत्ती पासून ४ किमी उत्तरेला) जंगल परिसरात घातपात घडविण्याच्या उद्देशाने एकत्रित जमुन तळ ठोकून आहेत, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशाने माओवादविरोधी अभियानाची योजना आखण्यात आली. अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांच्या नेतृत्वात विशेष अभियान पथक, गडचिरोली व पोलिस स्टेशन गॅरापत्ती तसेच सीआरपीएफ ११३ बटालियन कंपनीच्या जवानांनी या जंगल परिसरात लगेच माओवादविरोधी अभियान राबविणले. मौजा भिमनखोजी जंगल परिसरात शोधमोहिम राबवित़ पुढे जात असतांना गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान माओवादविरोधी अभियान पथकातील पहिल्या ग्रुपमधील जवानांना माओवाद्यांचा कॅम्प दिसून आला. या कॅम्पच्या दिशेने सुरक्षिततेची काळजी घेत पुढे जात असतांना पोलिस पथक आल्याचा सुगावा लागल्याने माओवाद्यांनी कॅम्पमधील सर्व साहित्य सोडुन पहाडी व घनदाट जंगलाचा फायदा घेत अगोदरच पळ काढला. माओवाद्यांच्या कॅम्पच्या ठिकाणी जाऊन शोध अभियान राबविले असता, सदर ठिकाणावरुन सोलार प्लेट १ नग, माओवादी डांगरी (पँट) २ नग, माओवादी पिट्टु ६ नग, चप्पल जोड ३ नग, ताडपत्री ३ नग, प्लॅस्टीक टेंट २ नग, बेल्ट ७ नग, टेस्टर २ नग, लाकडी मुठ असलेला पेचकस १ नग, शॉल २ नग, लुंगी १नग, शर्ट (फुल) ४ नग, टी शर्ट ६ नग, लोअर पँट २ नग, जॅकेट (हिरवा) १ नग, दुपट्टे (हिरवे व लाल) प्रत्येकी १ नग, कॅप २ नग, बेडशिट १ नग, मग (स्टिल) ४ नग, प्लेट (स्टिल) ६ नग, लायटर २ नग, गंज (जर्मन) २ नग, कैची १ नग, मेडीकल किट, पाणी कॅन ५ नग आदी दैनंदिन वापरातील साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष अभियान पथकाची सर्व पथके आज गडचिरोलीला सुखरूप पोहोचले आहे. छत्तीसगड सीमेवर माओवादविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत.