आणखी पाच गावांची पोलिसांना साथ, माओवाद्यांना गावबंदी

111

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. २४ : माओवादाविरोधात ग्रामस्थांचा रोष वाढत असून त्याच तुलनेत पोलिस दलांवरचा विश्वासही वाढत आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील आणखी पाच गावांनी माओवाद्यांना गावबंदीचा ठराव संमत केला आहे. भामरागड उपविभागाअंतर्गत धोडराज पोलिस स्टेशन येथे घेण्यात आलेल्या कृषी मेळाव्यात या सातही गावांनी माओवाद्यांच्या गावबंदीचा ठराव पोलिसांना सुपुर्द केला.

माओवाद्यांना गावबंदी करणाऱ्या गावांमध्ये मोरडपार, आलदंडी, कोयर, गोपनार व मुरुंगल या पाच गावांचा समावेश आहे.यापूर्वी परायनार, नेलगुंडा, कुचेर, कवंडे, गोंगवाडा, मिळदापल्ली व महाकापाडी या सात गावांतील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानुमते माओवाद्यांची गावबंदी करून त्याबाबतचा ठराव धोडराज पोलिस स्टेशनला दिला होता.त्यानंतर भटपारच्या ग्रामस्थांनीही माओवाद्यांना गावबंदी करून कुकरमध्ये ठेवलेल्या आयडीसदृश वस्तू, वायर, बॅटर व सलाखी (Spikes) धोडराज पोलिस स्टेशनला जमा केल्या होत्या. त्यात आणखी एक भर म्हणून गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी व सचिव व जहाल माओवादी, डिकेएसझेडसीएम गिरीधर तुमरेटी याने पत्नी ललीता चैतू उसेंडी (डिव्हीसीएम भामरागड दलम) सह उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. त्यामुळे माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या भामरागड व अबुझमाड जंगल परिसरातच त्यांच्या अस्तित्वाला खिंडार पडले आहे. मोरडपार, आलदंडी, कोयर, गोपनार व मुरुंगल ही पाचही गावे गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अबुझमाड परिसराच्या अगदी जवळ असल्याने या गावांमध्ये माओवाद्यांचे वर्चस्व होते. तसेच गावातील काही सदस्यांचा माओवाद्यांना पाठिंबा होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनास त्यांच्यापर्यंत पोहचण्यास अडचणी येत होत्या. येथील नागरिक हे शासनाप्रती उदासीन होते. परंतू मागील तीन वर्षामध्ये गडचिरोली पोलिस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडानअंतर्गत विविध जनजागरण मेळावे, दिव्यांग मेळावे, कृषी सहली, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, महिला मेळावे आदींच्या माध्यमातून येथील गावकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यात यशस्वी झाल्याने पोलिस दलाच्या प्रती येथील गावकऱ्यांचा विश्वास दृढ झाला. या पाचही गावांतील नागरिकांनी माओवाद्यांनी पोलिस पथकाला नुकसान पोहचविण्याच्या उद्देशाने जंगलात लपवून ठेवलेल्या पाच भरमार बंदूक तसेच जंगलात खड्डे करून त्यात पुरुन ठेवलेले धारदार लोखंडी २०० ते ३०० सळाखी (Spikes) काढून आणून पोलिस दलाकडे सुपूर्द केल्या. यासोबतच नेलगुंडा या गावातील नागरिकांनीही माओवाद्यांना गावबंदी केल्याचा ठराव सादर केला होता. त्यामुळे येथील गावकऱ्यांनी सुरक्षा रक्षक दलांना नुकसान पोहचविण्याच्या उद्देशाने जंगलात खड्डे करून त्यात पुरुन ठेवलेल्या ४५० सळाखी (Spikes)व कुकरमध्ये ठेवलेल्या आयडीसदृश वस्तू धोडराज पोलिस स्टेशन येथे जमा केल्या. ही कार्यवाही पार पाडण्यास भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, लाहेरी उप पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संतोष काजळे, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत डगवार, पोलिस उपनिरीक्षक सचिन सरकटे, पोलिस उपनिरीक्षक आकाश पुयड व धोडराज पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी शरद काकळीज, पोलिस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. माओवाद्यांना गावबंदी ठराव करणाऱ्या नव्या पाचही गावांतील नागरिकांचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अभिनंदन केले असून अबुझमाड जंगल परीसरातील इतर गावातील नागरिकांनी माओवाद्यांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता स्वत:च्या व गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.