सेवानिवृत्त शिक्षकांना रिक्त पदावर घेण्याच्या आदेशाची केली होळी

111

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

गडचिरोली, ता. ७ : स्थानिक इंदिरा गांधी चौकात बुधवार (ता. ७) आझाद समाज पक्षासह जिल्ह्यातील इतर समविचारी पक्ष व संघटना तसेच बेरोजगार तरुणांच्या वतीने तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारी आदेशाची होळीसुद्धा करण्यात आली. 

शिक्षण विभागाच्या वतीने १५ जुलै २०२४ रोजी आदेश काढून त्यात पेसा क्षेत्रातील रिक्त शिक्षकांच्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्याच्या सूचना क्र. १ नुसार देण्यात आल्या. गडचिरोली जिल्हा मागास जिल्हा आहे, त्यातच बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढलेले असताना Ded, Bed, Med, Bped, Phd झालेल्या बेरोजगार तरुणांना रोजगार न देता शासन ज्यांची कार्यक्षमता कमजोर होते म्हणून ५८ वर्षानंतर कर्मचाऱ्यांना निवृत्त करते आता त्याच कर्मचाऱ्यांना परत रिक्त पदावर घेण्याच्या सूचना करते, हा सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय आहे. एका बाजूला मुख्यमंत्री १५०० रुपये देऊन महिलांना लाचारीचे आमिष दाखवितात आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या मुलांच्या नोकऱ्या, रोजगार हिसकावून घेतात, हा खरेतर त्या महिलांवर अन्याय आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फसव्या योजनांची उलाढाल करत असताना बेरोजगारांचे हाल होत आहेत, असा आरोप आझाद समाज पक्षाचे प्रभारी धर्मानंद मेश्राम यांनी केला.

पेसा क्षेत्रातील रिक्त शिक्षक पदावर सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्याची अट रद्द करावी, रिक्त पदावर जिल्ह्यातील सुशिक्षित पात्र बेरोजगारांना घ्यावे, गडचिरोली जिल्हा हा मागास आदिवासी जिल्हा म्हणून अतिविशेष बाबअंतर्गत ज्याप्रमाणे इतर भरतीत पेसाअंतर्गत काही अटी शिथिल केल्या जातात त्या पद्धतीने शिक्षक भरतीत TAIT, TET सारख्या अटी शिथिल करून DEd, Bed, Med झालेल्यांना संधी द्यावी, जर खासगी शाळा, कॉन्व्हेंटमध्ये कित्येक शिक्षक TAIT नसताना शिक्षक म्हणून कार्यरत असताना आपण मान्यता देऊ शकता तर ही बाब विशेष मागास जिल्हा म्हणून आपण जिल्हा परिषद शाळेत शिक्षक भरतीसाठी शिथिल करूच शकता. त्यामुळे ही अट शिथिल करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या मागण्या पुढील ८ दिवसांत पूर्ण न केल्यास प्रत्येक तालुक्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल व बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी आझाद समाज पक्षाचे प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, कार्याध्यक्ष विनोद मडावी, महिला अध्यक्ष तारका जांभुळकर, भाकप नेते डॉ. महेश कोपुलवार, शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या जयश्री जराते, जंगोरायताड महिला संघटनेच्या अध्यक्ष आरती कोल्हे, विद्या दुगा, मालता पुडो, बीआयएनच्या उज्ज्वला शेंडे, माळी समाज संघटनेचे सुखदेव जेंगठे, लहुजी शक्ती सेनाचे ज्ञानेश्वर पायघन, बावणे, रिपब्लिकन पक्षाचे विजय देवतळे, आदिवासी विकास परिषद सोनू कुमरे, नयन कुमरे, अंकुश कोकोडे, सूरज कोडापे, शोभा खोब्रागडे, सचिव प्रकाश बन्सोड, नागसेन खोब्रागडे, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत पेदापल्लीवार, कुरखेड्याचे अध्यक्ष सावन चिखराम, आरमोरीचे शुभम पाटील, करुणा खोब्रागडे, संगीता मोटघरे, सविता बांबोळे, प्रतिमा करमे, प्रतीक डांगे, सतीश दुर्गमवार, सुरेश बारसागडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.