सेवानिवृत्त परीचारिकेच्या घरात घुसून जबरी चोरी करणारे चारही आरोपी अटकेत

202

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. ८ : आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील एका सेवानिवृत्त परीचारिकेच्या घरात दिवसाढवळ्या घुसून तिला खुर्चीला बांधून तिच्या घरात जबरी चोरी करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अखेर अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे.

पोलिस विभागाकडून प्राप्त माहितीनुसार आरमोरी पोलिस ठाण्यापासून ३ किमी अंतरावर असलेल्या ठाणेगाव (नवीन) येथे राहणाऱ्या सेवानिवृत्त परिचारीकेच्या घरात २९ जुलै २०२४ रोजी सकाळी १०.४५ ते १२.३० वाजताच्या सुमारास ३ अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून त्यांचे हातपाय खुर्चीला बांधून त्यांच्या घरातील कपाटामध्ये, ड्रेसींग टेबल येथे ठेवलेले व त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच हातात असलेली सोनाटा कंपनीची घड्याळ असा एकूण ३ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यासंदर्भात आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास वरीष्ठांच्या मार्गदर्शनात गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, त्यांचे अधिकारी व अंमलदार तसेच आरमोरी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तंत्रशुद्ध पद्धतीने केला. गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याचा शोध पोलिसांनी लावला असून यातील आरोपी अंकित भिमराव लटारे (वय २४) रा. ठाणेगाव, प्रशांत विलास राऊत (वय २२) रा. रामाळा यांना ६ आॅगस्टला व यातील फरार आरोपी प्रतिक राजू भुरसे (वय २३) रा. ठाणेगाव याचा शोध घेऊन आरमोरी पोलिसांनी त्याला ७ आॅगस्टला जेरबंद केले. तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेला विधीसंघर्षग्रस्त बालक १७ वर्षे ६ महिने रा. ठाणेगाव याला ताब्यात घेऊन त्याला बालसुधारगृहात रवाना करण्यात आले. या गुन्ह्यातील तिन्ही अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना १२ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. अटक आरोपींकडे गन्ह्याच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता आरोपी अंकित भिमराव लटारे हा या गुन्ह्याचा प्रमुख सुत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यातील मुद्देमाल छत्तीसगड राज्यातील भिलाई येथे लपवून ठेवला असल्याचे निष्पन्न झाल्याने हा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला. तसेच अटक आरोपींचा यापुर्वीसुद्धा अशाच प्रकारच्या आणखी कोणकोणत्या गुन्ह्यात सहभाग होता याबाबत पोलिस दलाकडून कसून शोध घेण्यात येत आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरीष्ठांच्या मार्गदर्शनात आरमोरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विजय चलाख करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास फुसारी, आरमोरी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तथा पोलिस निरीक्षक विनोद रहागंडाले, स्थानिक गुन्हे शाखेचे व पोस्टे आरमोरी अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली आहे.

——————–