रेल्वेगाडीच्या जबरदस्त धडकेत वाघीणीचा हकनाक मृत्यू

155

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १२ : जिल्ह्यातील वडसा वनविभागाअंतर्गत वडसा परिक्षेत्रातील उपक्षेत्र वडसा नियतक्षेत्र एकलपूर कक्ष क्रमांक ९७ (राखीव वन) मध्ये गांधीनगर गावानजीक बल्लारपूर- गोंदिया रेल्वे मार्गावर माल वाहतुक रेल्वेच्या जबरदस्त धडकेत ४ वर्षीय वाघीणीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार (ता. १२)पहाटे ५.३० वाजताच्या दरम्यान घडली.

या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचलवार, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) दीपक मेडीकुंटावार, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. मृणाल टोंगे, पशुवैद्यकिय अधिकारी, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले. मोका स्थळाची पाहणी केली असता वाघीण मृतावस्थेत आढळून आली. मृत वाघीणीचा मोकास्थळी पंचनामा नोंदवून वडसा परिक्षेत्रातील वडसा येथील रोपवाटिकेत आणण्यात आले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमुने मृत वाघीणीच्या मताची उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण केली. मृत वाघीणीचे सर्व अवयव असल्याचे आढळून आले. पंचांच्या उपस्थितीत तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसार मृत वाघीणीला जाळून नष्ट करण्यात आले. संपूर्ण शरीर नष्ट होईपर्यंत सर्व अधिकारी व पंच मोक्यावर उपस्थित होते. ही कार्यवाही उपवनसंरक्षक (प्रादेशिक) धर्मवीर सालविठ्ठल यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय वनाधिकारी मनोज चव्हाण, वनपरीक्षेत्र अधिकारी विजय धांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) एम. जी. मेश्राम, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) दीपक मेडीकुंटावार, सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. मृणाल टोंगे, पशुवैद्यकिय अधिकारी अनिल दशहरे उपस्थितीत व वडसा परीक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी कराडे, क्षेत्रसहायक तिजारे, अजय मराठे, वनरक्षक गजभिये, भोजराम भुरकुंडे, वाहनचालक मनन शेख यांच्या सहकार्याने पार पडली असल्याचे वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी कळविले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक वाघ वडसा वनविभागात आहेत. त्यामुळे या वाघांचे संरक्षण, संवर्धन करण्यासोबतच त्यांच्यामुळे नागरिकांना धोका होणार नाही, याची काळजी घेण्याचे आव्हानही वनविभागापुढे आहे.

———————————