कोरचीत दुकानाला लागलेल्या आगीत तीन लाखांचे नुकसान

111

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

कोरची, ता. १९ : शहरातील फवारा चौकात मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या नंदकिशोर धकाते यांच्या ऑटो पॉइंट सर्व्हिस सेंटर या दुकानाला मंगळवार (ता.१७) रात्री १० वाजताच्या सुमारास आग लागून जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.

नेहमीप्रमाणे नंदकिशोर धकाते हे मंगळवारी सायंकाळी सात वाजता दुकान बंद करून स्वगावी कोचीनारा येथे गेले होते. रात्री १० वाजतादरम्यान दुकानातून आवाज येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शेजारी राहणारे भूपेंद्र गुरूभेलिया यांच्या कुटुंबीयांनी धकाते यांना फोनवरून माहिती दिली. परिसरातील लोकांनी बाजूला असलेल्या विहिरीतून पाणी आणून दुकानातील आग विझवण्यास सुरुवात केली. मात्र, तोपर्यंत आगीत संपूर्ण दुकान भस्मसात झाले होते. यात दुकानातील महागडे साहित्य जळून खाक झाले. ही आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कोरची ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी नंदकिशोर धकाते यांनी अतिशय मेहनतीने दुकान सुरू केले होते. त्यासाठी त्यांना मित्रांनी सहकार्य केले होते. आता दुकान आगीत खाक झाल्याने त्यांच्यासमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. फवारा चौक परीसरात इतर व्यापारी दुकाने आहेत. नंदकिशोर धकाते यांच्या दुकानातील आगीचे लोळ बाहेर पडत असल्याने गोंधळ उडाला. मात्र, नागरिकांनी तत्परता दाखवत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

————————————–