महाराष्ट्र पोलिस दलाचा रेझिंग डे सप्ताह सुरू

71

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता. ३ : महाराष्ट्र पोलिस दलाचा स्थापनादिन २ जानेवारी असून यानिमित्त २ ते ८ जानेवारीपर्यंत गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने जिल्ह्यात रेझिंग डे सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहाचा गुरुवार (ता. २) विविध कार्यक्रमांनी प्रारंभ करण्यात आला.

रेझिंग डे सप्ताह कालावधीत पोलिस दलाकडून विविध उपक्रम राबविले जातात. यानिमित्ताने गुरुवारी सकाळी १० वाजता गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस दलाचे पथसंचलन पार पडले. २ जानेवारीपासून जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्रामध्ये रेझींग डे साजरा करण्यात येणार आहे. गडचिरोली पोलिस दलाकडुन प्रत्येक शाळेमध्ये शस्त्र प्रदर्शन, गडचिरोली पोलिस दलाविषयी माहिती, सायबर गुन्हे, महिला सुरक्षा या विषयीचे फलक दर्शवून लोकांमध्ये जनजागृती तसेच स्वच्छता अभियान, रस्ता सुरक्षा रॅली व व्यसनमुक्ती संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी गडचिरोली शहरातील कारगील चौकापासून पथसंचलन सुरू होऊन इंदिरा गांधी चौक ते बस स्थानक येथून परत इंदिरा गांधी चौक येथे येऊन पथसंचलनाची सांगता करण्यात आली. या पथसंचलनात पोलिस दलातील विविध शाखांनी सहभाग घेऊन महिला सुरक्षा, सायबर जनजागृती, वाहतूक नियम या विषयीचे फलक दर्शवून लोकांमध्ये जनजागृती केली. पथसंचलनामध्ये ध्वजवाहक, पोलिस मुख्यालय महिला प्लाटून, विशेष अभियान पथकाचे प्लाटून, बँड पथक, शालेय विद्यार्थी, बुलेट प्लाटुन, टु व्हिलर वाहन प्लाटुन, श्वान पथक, बीडीडीएस पथक व एमपीव्ही वाहन यांनी शिस्तबद्ध पथसंचलन केले. या पथसंचलनामध्ये गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, पोलिस स्टेशन, पोलिस मुख्यालय, मोटार परिवहन विभाग, विशेष अभियान पथक, सिव्हीक अॅक्शन, प्रोपागंडा, श्वान पथक, बीडीडीएस, सीटीसी, सायबर सेल, भरोसा सेल आदी शाखांतील अधिकारी व अंमलदार तसेच शासकीय इंग्रजी माध्यमीक आश्रमशाळा, सरस्वती विद्यालय, महिला महाविद्याल तसेच पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी असे एकूण २५० विद्यार्थी- विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदविला. पथसंचलनामध्ये गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप, गडचिरोली पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रेवचंद सिंगनजुडे, राखीव पोलिस निरीक्षक अनुजकुमार मडामे व विविध शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

—————————————–