गडचिरोली जिल्ह्याचा इतिहास, संस्कृतीसह नैसर्गिक सौंदर्य दर्शवणारे कॉफी टेबल बुक

206

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 गडचिरोली, ता. ३ : जिल्ह्याची ओळख संपूर्ण भारतात माओवादग्रस्त, आदिवासीबहुल, अतिदुर्गम, आकांक्षित जिल्हा म्हणून निर्माण झाली होती. त्यामुळे या जिल्ह्याचा खरा इतिहास, संस्कृती तसेच येथील नैसर्गिक सुंदरता अद्याप जगापुढे आली नाही. मात्र लाॅयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकर यांच्या संकल्पनेतून आणि कंपनीचे निवासी संचालक कर्नल विक्रम मेहता यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा इतिहास, संस्कृतीसह नैसर्गिक सौंदर्य दर्शवणारे अप्रतिम कॉफी टेबल बुक तयार करण्यात आले. नवर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवार (ता. १) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते आदिम वैभवाचा वारसा असलेला हा ग्रंथराज प्रकाशित करण्यात आला. विशेष म्हणजे हे कॉफी टेबल बुक दोन भाषांत तयार करण्यात आले आहे. 

कोनसरी येथे आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या काॅफी टेबल बुकचे प्रकाशन केले. याप्रसंगी आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, लॉयड मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, विशेष सल्लागार पद्मश्री डॉ. तुलसी मुंडा, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डाॅ. देवराव होळी, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलिस महनिरीक्षक दिलीप भुजबळ, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, रवींद्र ओल्लालवार, तनुश्री आत्राम आदींची प्रमुख उपस्थिती होते.जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा, आदिवासी लोककला, संस्कृती व जिल्ह्यातील नैसर्गिक साधन संपत्ती तसेच निसर्गरम्य पर्यटन स्थळांची माहिती या कॉफी टेबल बुकमध्ये देण्याचे ठरवले मात्र गडचिरोलीचा इतिहास शोधणे हे काम सोपे नव्हते. कारण या जिल्ह्याच्या इतिहासाच्या नोंदी फारश्या प्रमाणात केल्या गेलेल्या नाहीत. या जुन्या इतिहासाला शोधून काढण्याकरिता कर्नल विक्रम मेहता यांनी जिल्ह्यातील अगदी तळागाळातील माणसांपासून तर मोठे नामवंत इतिहासकार तसेच स्थानिक इतिहासकारांकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या हातात गोंड राजांचा इतिहास आला. त्या इतिहासाच्या काही लिखित स्वरूपात असलेल्या माहितीनुसार गडचिरोलीचा खरा इतिहास पुढे येण्यात सुरुवात झाली. हा इतिहास इतका प्रभावशाली व संशोधनासारखा होता की, त्यामुळे कर्नल विक्रम मेहता यांना या इतिहासाच्या आणखी खोलात जाण्याची प्रेरणा मिळाली. या प्रेरणेतून त्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासाबाबत आणखी खोलवर माहिती घेण्याकरिता गडचिरोली जिल्हा होण्याआधी चांदा ते बांद्यापर्यंतची संपूर्ण माहिती गोळा करणे सुरू केले. या माहितीच्या आधारावर त्यांनी अथक परीश्रमाने हे कॉफी टेबल बुक आकारास आणले. लाॅयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड व त्रिवेणी अर्थमूव्हर्स यांनी गडचिरोली येथील सुरजागड येथे लोह खनिज उत्खननासाठी केलेला प्रारंभ आणि रोमांचक प्रवासाची चित्रमय माहितीदेखील या कॉफी टेबल बुकमध्ये दिलेली आहे. तसेच हे लोह खनिज बाहेर जिल्ह्यात न नेता त्यावर जिल्ह्यातच प्रक्रिया व्हावी व स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यातूनच कोनसरी प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या कोनसरी प्रकल्पात जिल्ह्यातील हजारो लोकांना रोजगार मिळत असून या नव्या वर्षांत पुन्हा ५ हजार लोकांना रोजगार देण्यात येणार आहे. बेरोजगारीचा शाप भोगत असलेल्या या जिल्ह्यातील ही समस्या दूर करण्यात मोठे योगदान देत असलेल्या कोनसरी लोहखनिज प्रक्रिया प्रकल्पाची रंजक माहितीसुद्धा या कॉफी टेबल बुकमध्ये देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील तरुणाईचे कौशल्य विकसित करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठासोबत मिळून उभारण्यात आलेल्या स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटरची देखील माहिती आहे. जिल्ह्यातील युवकांना विविध खेळांच्या माध्यमातून प्रगतीच्या नव्या संधी देण्याकरिता करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरांचीही माहिती आहे. आजवर ६३ हजारहून अधिक रुग्णांवर उपचार करणारे काली अम्मल मेमेरियल हाॅस्पिटल, महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण तसेच वस्त्रोद्योगाबाबतचे मोठे प्रशिक्षण वर्ग, अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांची माहितीसुद्धा यात आहे. पुढील पाच वर्षात गडचिरोली महाराष्ट्राच्या टॉप फाईव्ह जिल्ह्यांमध्ये आणण्यासाठी व औद्योगिक प्रगतिशील जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख होण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न या पुस्तकात चित्रबद्ध व शब्दबद्ध करण्यात आले आहेत. जिल्ह्याची ओळख संपूर्ण देशाला व्हावी, यासाठी या कॉफी टेबल बुकचे वितरण संपूर्ण देशभरात करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कॉफी टेबल बुकचे कौतुक केले असून हा जिल्ह्याचा आदिम वारसा व प्रगतीची दिशा सांगणारा महत्त्वपूर्ण दस्तावेज असल्याचे म्हटले. या कॉफी टेबल बुकच्या प्रती मोठ्या संख्येने वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे निवासी संचालक विक्रम मेहता यांनी दिली. लाॅयड्स मेटल्स अॅंड एनर्जी लिमीटेड कंपनीने लॉयड्स राजविद्या निकेतन ही सीबीएससी अभ्यासक्रमाची शाळा सुरू केली आहे. एटापल्ली तालुक्यातील हेडरीसारख्या अतिदुर्मग परीसरातील अनेक गावांतील बालके मातृभाषा गोंडी, माडीयासह आता अस्खलित इंग्रजीही बोलू लागले आहेत. सध्या येथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असले, तरी जवळपास १२ हजार विद्यार्थ्यांपर्यंत या शाळेचा विस्तार करण्यात येणार आहे. सुरजागड लोह खनिज प्रकल्प परीसरातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी सुरू असलेल्या या शैक्षणिक उपक्रमाची नोंदसुद्धा या कॉफी टेबल बुकमध्ये आहे.

————————————-