ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १० : चामोर्शी तालुक्यातील मौजा येनापूर येथील तलावाच्या पोटात नवीन शाळा इमारतीचे सुरू केलेले बांधकाम रद्द करून सुरक्षित जागेवर बांधकाम करावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली,संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती चामोर्शी, कार्यकारी अभियंता (सर्व शिक्षा अभियान) जिल्हा परिषद गडचिरोली यांना ग्रामस्थांनी दिले.गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या पत्रकार परिषदेमध्ये पालक आणि ग्रामस्थांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.
या पत्रकार परीषदेत पालक व ग्रामस्थ म्हणाले की, चामोर्शी तालुक्यातील मौजा गटग्रामपंचायत सोमनपल्लीअंतर्गत मौजा येनापुर जिल्हा परीषद शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम मंजुर झाले असल्याने ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांनी पाच महिन्यांपूर्वी सरपंच नीलकंठ निखाडे यांनी वनविभागाच्या दुर्गापूर हद्दीमध्ये तलाचाच्या पोटात खोदकाम करून शाळा बांधकामास सुरुवात केली. त्यावेळीसुद्धा ग्रामस्थांनी तलावाच्या पोटात शाळा इमारतीचे बांधकाम करण्यास विरोध करून बांधकाम थांबवले होते. परंतु परत त्याच ठिकाणी तलावाच्या पोटात मागील बांधकाम केलेल्या जागेच्या बाजुला परत ले आऊट देऊन बांधकामास सुरुवात केली आहे. या नवीन शाळा इमारतीचे तलावाच्या पोटात बांधकाम केल्यास तलावात पाणी राहत असल्याने विद्यार्थ्यांच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ही जागा दलदलीची असल्याने इमारतीचे बांधकामसुद्धा कोसळण्याची शक्यता आहे. तलावाखाली शेतकऱ्यांची शेती असुन शेतीतील धानपिकाचे उत्पन्न घेऊन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. या इमारतीमुळे तलावाची पार फोडण्याची पाळी आल्यास शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी येऊ शकते. या सर्व बाबींचा विचार करून दुसन्या सुरक्षित ठिकाणी शाळेच्या इमारतीचे बांधकाम करण्यात यावे, यापूर्वीसुद्धा सरपंच व सचिवांनी संगनमत करून ग्रामपंचायतीमध्ये गैरव्यवहार केल्याच्या अनेक तक्रारीसुद्धा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये करण्यात आल्या आहेत. तरी आतापर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही.असा आरोप गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या पत्रकार परिषदेमध्ये पालक आणि ग्रामस्थांनी केला आहे. या ठिकाणी बळजबरीने बांधकाम केल्यास शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवास धोका असून काही अप्रिय घटना घडल्यास याला ग्राम पंचायतीचे सरपंच आणि सचिव तसेच तलावाच्या पोटात बांधकाम करण्यास मंजुरी देणारे प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहतील. तलावाच्या पोटात होणारे नव्या शाळा इमारतीचे बांधकाम तत्काळ यांबविण्यात यावे व इतर ठिकाणी सुरक्षित जागेवर शाळा इमारतीचे बांधकाम करावे, अशी मागणी गावकरी व विद्यार्थ्यांच्या पालकानी केली आहे. पत्रकार परिषदेला सुरेश विठोबा गुंतीवार,राजू येगोलपवार, राहुल येगोलपवार, गमतीदास राऊत, आदित्य जाधव, हनुजी कन्नाके, शांताराम कुमरे, किशोर गोपवार, मोहन बंडावार तथा पालक व गावकरी मंडळी उपस्थित होते.
——









