माओवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या १८ शहीद जवानांच्या कुटुंब, पाल्यांना दिली मदत

99

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १२ : गडचिरोली पोलिस दलामार्फत जैन जागृती केंद्र, सेंट्रल बोर्ड, चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील जांभुळखेडा भुसुरुंग स्फोट, पोयारकोटी-कोपर्शी चकमक व कोठी येथील माओवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना व त्यांच्या पाल्यांना मदत स्वरूपात सन्मान निधीचे वाटप रविवार (ता. १२) करण्यात आले.

गडचिरोली हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. माओवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे गडचिरोली पोलिस दलास येथे पारंपरिक पोलिसींग सोबतच माओवादविरोधी अभियान व नागरी कृती उपक्रम या दोन्ही आयामांवर कार्य करावे लागत असते. माओवादी चळवळीला अटकाव करण्याकरिता, माओवादापासून आपल्या मातृभूमीचे रक्षण करत असताना आतापर्यंत केंद्र व राज्य सुरक्षा दल व गडचिरोली पोलिस दलाच्या एकूण २१२ जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. शासनाच्या विविध योजनांअंतर्गत गडचिरोली पोलिस दलाच्या विविध उपक्रमांद्वारे तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शहीद जवानांच्या बलिदानाची जाण ठेवून त्यांच्या कुटुंबियांना व पाल्यांना अनेक प्रकारे मदत पुरविली जात असते. याचाच एक भाग म्हणून रविवारी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना व त्यांच्या पाल्यांना मदत स्वरूपात सन्मान निधीचे वाटप करण्यात आले. यामध्ये दिनांक १ मे २०१९ रोजी झालेल्या जांभुळखेडा भुसुरुंग स्फोटात शहीद १५ जवान, दिनांक १७ मे २०२० रोजी झालेल्या पोयारकोटी-कोपर्शी चकमकीत शहीद २ जवान व दिनांक १४ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या मौजा कोठी येथील माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद १ जवान अशा एकूण १८ जवानांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येकी १, ००, ००० रुपयांच्या धनादेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांशी संवाद साधताना सांगितले की, गडचिरोली पोलिस दल शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या सदैव पाठिशी असून त्यांच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील. या कार्यक्रमाप्रसंगी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्यासह जैन जागृती केंद्र, सेंट्रल बोर्ड, चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबईचे अध्यक्ष संजय शहा, उपाध्यक्ष जितेंद्र कोठारी व इतर पदाधिकारी तसेच विविध शाखांचे व सी-६० चे अधिकारी व जवान उपस्थित होते.

——————————