लॉयड मेटल गडचिरोली प्रीमियर लीग’ (जीपीएल) क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ ५ फेब्रुवारीला

157

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १३ : लॉयड्स मेटल्स अॅंड एनर्जीच्या वतीने येत्या ५ फेब्रुवारीपासून येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर ‘लॉयड्स मेटल्स गडचिरोली प्रीमियर लीग’ (जीपीएल)क्रिकेट स्पर्धेचे (लेदर बॉल) आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे सर्व सामने दिवस-रात्र खेळवल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. अशी माहिती गुजरातचे सेवानिवृत्त डीजीपी तथा भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) अँटी करप्शन ब्युरोचे एस. एस. खांडवावाला  यांनी आज (ता. १३)आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला लाॅयड्स मेटलचे निवासी संचालक सेवानिवृत्त कर्नल विक्रम मेहता, बलराम (भोलू) सोमनानी, वेदांत जोशी, रोहित तोंबर्लावार, डॉ. सलुजा, मंगेश देशमुख तसेच लाॅयड्सचे क्रीडा स्पर्धेचे प्रमुख व इतर सदस्य उपस्थित होते. या स्पर्धेत जिल्ह्याभरातील १६ संघ सहभागी होणार आहेत. ४ ग्रुप मध्ये संघ विभागणी करण्यात आली आहे. ४ ग्रुपमधून पहिले दोन अव्वल संघ एकमेका विरोधात क्वार्टर फायनल खेळणार आहेत. त्यानंतर विजेता होणारा सेमीफायनल व त्यातून विजेता होणारा यांच्यात अंतिम सामना होणार आहे.अंतिम सामना हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी शेवटी होणार आहे. ‘लॉयड मेटल गडचिरोली प्रीमियर लीग’ (जीपीएल) क्रिकेट स्पर्धेत प्रथम पारितोषिक ११ लाख ११ हजार ११ रुपये असणार आहे, द्वितीय पारितोषिक ७ लाख आणि तिसरा ५ लाख रुपये आहे. चौथे पारितोषिक २ लाख रुपये आहे. प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच २५ हजार रुपये क्वार्टर फायनल सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ५० हजार रुपये, सेमी फायनल सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ७५ हजार रुपये व अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच १ लाख रुपयांची बक्षिसे जाहीर केली आहेत. ही स्पर्धा किमान १५ दिवस चालणार आहे. सामन्यातील पंच हे उच्च दर्जाचे राहणार आहेत.रनिंग कॉमेंट्रीसाठी प्रसिद्ध अँकरना आमंत्रित करण्यात आले आहे. संपूर्ण सामने यू ट्यूबवर थेट दाखवले जातील आणि जगभरातील क्रिकेटप्रेमी ते पाहू शकतील, असेही पुढे सांगण्यात आले.ही स्पर्धा पुढील पाच वर्ष सतत चालणार आहे. लॉयड मेटल्सतर्फे आयोजित गडचिरोली प्रीमियर लीगला पुढील पाच वर्षांत भरघोस प्रतिसाद मिळाला तर येत्या काळात गडचिरोली जिल्ह्यामध्ये भव्य स्टेडियम उभारणार अशी माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे. ‘लॉयड्स मेटल्स गडचिरोली प्रीमियर लीग’ स्पर्धेतील गुणवंत खेळाडूंना नागपूर येथील अकॅडमीत प्रवेश देणार असल्याची माहिती पत्रकार परीषदेत देण्यात आली.

——————————————