भाजप जगातील सर्वांत मोठा पक्ष : माजी खासदार अशोक नेते

111

गडचिरोली, ता. १९ : सदस्य संख्येचा विक्रम करून भारतीय जनता पक्ष जगातील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. ही संख्या अधिक वाढवण्यासाठी भाजप पक्ष नोंदणीचे विशेष अभियान राबवत असून जिल्ह्यात आतापर्यंत २८ हजारहून अधिक सदस्यांची नोंद झाल्याची माहिती माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी पत्रकार परीषदेत दिली.

या पत्रकार परीषदेला माजी खासदार अशोक नेते यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, लोकसभा समन्व्यक तथा विधानसभा संयोजक प्रमोद पिपरे, सहकार आघाडी प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशीष पिपरे आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देताना माजी खासदार नेते म्हणाले की, भाजपची सदस्यता नोंदणी मोहीम सुरू झाली आहे. पूर्वी ही मोहीम १५ जानेवारीपर्यंत होती. पण आता २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. २०१४ मध्ये विद्यमान केंद्रीय गृहमंत्री तथा पक्षाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यकाळात सदस्यता मोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळी ११ कोटी ५० लाख सदस्यांची नोंद करण्यात आली होती. चिनमधील कम्युनिस्ट पक्षाची सदस्य संख्या ७ कोटी ५० लाख होती. त्यामुळे तेव्हापासूनच भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष झाला आहे. आता पक्षाने पुन्हा आदेश दिल्याने मोहीम राबिण्यात येत आहे. आतापर्यंत २८ हजारहून अधिक सदस्य झाले आहे. राज्यात एक कोटी सदस्य करण्याचे लक्ष्य आहे. प्रत्येक बूथवर २०० सदस्य करणार येणार असून त्यात ५ सक्रीय सदस्य राहतील. सामान्य सदस्य होण्यासाठी कोणतेही शुल्क नसून सक्रिय सदस्यांसाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. विशेष म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून सक्रिय सदस्यांनाच सहभाग घेता येईल. तसेच या सक्रिय सदस्यांना आणखी ५० सदस्य नोंद करण्याचे लक्ष्य निर्धारीत करून देण्यात आले आहे. एका विधानसभेत ७ हजार सदस्यांची नोंद करण्यात येणार आहे. आतापर्यंत ५ जानेवारी, १४ जानेवारी, १७ जानेवारीला विशेष नोंदणी अभियान राबविण्यात आले. आता भामरागडला हे नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे.मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व विरोधी पक्षांनी भाजप संविधानविरोधी असल्याचा अपप्रचार केला. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर संविधान बदलले जाईल, आरक्षण संपेल असे फेक नरेटिव्ह पसरवले. मुसलमानांना पाकिस्तानला जावे लागेल, असे सांगितले. खरेतर २०१४ पासून देशात भाजपची एकहाती सत्ता आहे. पण संविधानाच्या एका पानालाही धक्का लागला नाही. उलट काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी उठता-बसता संविधानाचा गजर करतात, संविधान हातात घेऊन प्रत्येक ठिकाणी फिरतात त्यांना संविधानात किती पाने आहेत हेसुद्धा माहिती नाही. मागील ६४ वर्षांत काँग्रेसनेच संविधानाचा गैरवापर केला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली होती. संविधानाचा सर्वाधिक विरोध काँग्रेसने केला. त्यांनी संविधाननिर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पराभूत करण्याचे पाप केले. मात्र भाजपने संविधानाचा सदैव सन्मान केला असून हे ११ ते २६ जानेवारीपर्यंत संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असल्याची माहिती पत्रकार परीषदेत माजी खासदार अशोक नेते यांनी दिली. तसेच थोर आदिवासी क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांची १५ नोव्हेंबरला जयंती असून त्यांच्या जयंतीला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांची जयंती जनजाती गौरवदिन म्हणून संपूर्ण वर्ष साजरी करण्यात येणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या ७५ आदिवासींचे शूरवीरांच्या स्मारकांची निर्मिती होणार असल्याचेही ते म्हणाले.

—————————————-