गडचिरोलीचे युवक धावले मुंबईच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये

74

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १९ : गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या प्रोजेक्ट उडानअंतर्गत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून व अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्ह्यातील २५ युवक-युवती व पोलिस अधिकारी/अंमलदार यांनी रविवार (ता. १९) मुंबई येथे होत असलेल्या टाटा मॅरेथॉनमध्ये ४२ कि.मी (फुल मॅरेथॉन), २१ कि.मी. (हाफ मॅरेथॉन) व १० कि.मी. मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदविला.

मुंबई येथे दरवर्षी टाटा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये राज्यातीलच नव्हे तर परदेशातील खेळाडूसुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. या मॅरेथॉन स्पर्धेकरिता गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील युवकांना संधी देण्यासाठी ६४ पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्रामधील युवकांची निवड चाचणी घेण्यात आली. त्यानंतर २५ युवक-युवतींची निवड करून गडचिरोली पोलिस दलातर्फे मॅरेथॉनसाठी लागणारे सर्व साहित्य वाटप करून राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून योग्य सरावाचे नियोजन करून दोन महिन्यांचे निवासी प्रशिक्षण पोलिस मुख्यालय येथे देण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यान युवक-युवतींना त्यांची शारीरिक क्षमता वाढविण्याकरिता कसून सराव घेण्यात आला. यामध्ये २१ किमी, २५ किमी, ३५ किमी व ४२ किमी. धावणे, स्टेन्थनिंग एक्सरसाईज, एबीसी एक्सरसाईज, हिल एक्सरसाईज आधी शारीरिक कवायतींचा समावेश होता. या प्रशिक्षणादरम्यान युवक-युवतींना वेळोवेळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांनी मार्गदर्शन केले. टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धमध्ये २१ किमी. गटात गडचिरोलीचे अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, पोलिस उपनिरीक्षक विश्वंबर कराळे, परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक ईश्वर सुरवासे, अविनाश कांदो, उमेश मट्टामी, मुकेश रापंजी, नयन गुरनुले, सौरभ कन्नाके, प्रमोद पुराम, राकेश तुलावी, सादु कांदो, ओंकार दर्रो, स्वप्निल गुरनुले, अमित कावळे, सूरज बोटरे, अमोल मडावी, तुषार गावतुरे, श्रेयस वाढई तसेच अमोल पोरटे (४२ किमीमध्ये ३ तास २४ मी.) आणि २१ किमी या गटात पोलिस अंमलदार लीलाधर खरबनकर, रोहन भुरसे (२१ किमीमध्ये १ तास १९ मि.), प्रियंका ओक्सा (२१ किमीमध्ये १ तास २८ मी.), साक्षी पोलोजवार (२१ किमीमध्ये १ तास ४५ मि.), पोलिस अंमलदार नाजूक मोहुर्ले (१० किमीमध्ये ३९ मि. १३ सेकंद) यांनी सहभाग नोंदविला. मुंबई येथील टाटा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांनी सहभाग नोंदवून गडचिरोली येथील युवकांचा उत्साह वाढविला.टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत गडचिरोलीचे युवक सहभागी होण्यासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक अहेरी श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनात सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक धनंजय पाटील, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत शेळके व अंमलदारांनी सहकार्य केले.

————————————–