तुम्हाला माहिती आहे का ? इथे चक्क हत्तींना मिळते उपचारासाठी सुट्टी !

72

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १९ : तुम्हाला कुठल्याही सरकारी, निमसरकारी, खासगी कार्यालयात काम करत असलेल्या अधिकारी, कर्मचारी व इतर स्टाफला विविध प्रकारच्या सुट्ट्या मिळतात हे माहित असेल,पण हत्तींनासुद्धा उपचारासाठी सुट्टी मिळते हे तुम्हाला माहिती आहे का ? ही सुट्टी राज्यातील एकमेव असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर शासकीय हत्ती कॅम्पमधील हत्तींना दरवर्षी दिली जाते. येथे कार्यरत असलेले ९ हत्ती आता दहा दिवसांच्या सुट्टीवर जाणार असून २० जानेवारी ते २९ जानेवारीपर्यंत हा कॅम्प बंद राहणार आहे.

गडचिरोली वनवृत्त, सिरोंचा वनविभागाअंतर्गत कमलापुर वनपरीक्षेत्रमध्ये कार्यरत असलेल्या नऊ हत्तींची चोपिंग करण्यात येणार आहे. वाढत्या थंडीमुळे हत्तीच्या तळपायाला भेगा पडतात. चालताना त्यांना त्याचा त्रास होतो. त्या भेगांवर आणि दुखऱ्या पायांवर उपचारासाठी त्यांना वैद्यकीय सुट्टी देण्यात आली आहे. अशी सुट्टी त्यांना दरवर्षीच देण्यात येते. या १० दिवसांत त्यांच्या पायांना चोपिंग औषधांचा शेक दिला जातो. ४०-४५ प्रकारच्या जडीबुटींपासून हे औषध तयार केले जाते. त्यासाठी हिरडा, बेहडा, सुंठ, त्रिफळा, जायफळ, अस्मानतारा अशा वेगवेगळ्या वनस्पतींचा व औषधांचा वापर करून एका ड्रममध्ये चोपिंगचा लेप तयार करतात. तो लेप करून पहाटेला व सायंकाळी हत्तीचे पाय शेकतात.महाराष्ट्रातील एकमेव हत्ती बघण्यासाठी कमलापुर हत्ती कॅम्पला अनेक पर्यटक येत असतात. पण सध्या १० दिवसांसाठी हा कॅम्प बंद असून हत्ती सध्या उपचारासाठी सुट्टीवर आहेत. दरवर्षी या काळात हत्तींना आराम देऊन त्यांच्या पायांना चॉपिंग केले जाते, अशी माहिती कमलापूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी पी. बी. झाडे यांनी दिली. ३० जानेवारीपासून कॅम्प नेहमीप्रमाणे सुरळीत चालू होणार आहे. सध्या थंडीची लाट असल्याने हत्तींच्या पायांना भेगा पडू नये म्हणून त्यांना आवश्यक असे चोपींग उपचार केले जात असल्याचे हत्ती कॅम्पचे प्रभारी वनरक्षक गुरुदास टेकाम यांनी सांगितले. दहा दिवस चालणाऱ्या या चोपिंगमध्ये हत्तींची विशेष काळजी घेतली जाते. या दरम्यान त्यांच्या प्रकृतीची तपासणी व रक्त तपासणी केली जात असल्याची माहिती कमलापूरचे पशु वैद्यकीय वन्यजीव अधिकारी डॉ. महेश येमचे यांनी दिली आहे.

————————————–