ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली,ता. ११ : अतिदुर्गम दिरंगी आणि फुलनार गावाच्या जंगल परीसरात असलेला माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात गडचिरोली पोलिसांना मंगळवार (ता. ११) यश मिळाले.
दिरंगी आणि फुलनार या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून माओवाद्यांनी तळ उभारल्याच्या विश्वासार्ह माहितीच्या आधारे सोमवारी अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) आणि अपर पोलिस अधीक्षक अहेरी यांच्या नेतृत्वात १८ सी-६० चे पथक आणि सीआरपीएफच्या क्यूएटीची २ पथके रवाना करण्यात आली होती. येथे ठिकाणी मंगळवारी सकाळी पोलिसांकडून घेराबंदी करण्यात आली. दिवसभरात माओवादी आणि पोलिस पथकांमध्ये गोळीबार सुरू होता. पोलिसांच्या संयुक्त पथकाने माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला असून माओवादी साहित्य आणि विविध वस्तू जप्त केल्या आहेत. या कारवाईदरम्यान सी-६० पथकाच्या एका जवानाला गोळी लागून दुखापत झाली असून या जवानास तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी हेलिकॉप्टरने गडचिरोली/नागपूर येथे हलवण्यात आले आहे. या परिसरात पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे. अधिक माहिती लवकरच कळविण्यात येईल, असे पोलिस विभागाने म्हटले आहे.









