माओवाद्यांचा तळ उद्धवस्त केला, पण पोलिस जवान शहीद झाला

575

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. ११ : अतिदुर्गम दिरंगी आणि फुलनार गावाच्या जंगल परीसरात असलेला माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात गडचिरोली पोलिसांना मंगळवार (ता. ११) यश मिळाले. मात्र यावेळी झालेल्या चकमकीत पोलिस अंमलदार महेश कवडू नागुलवार हा सी-६० पथकाचा जवान गोळी लागून शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे.

दिरंगी आणि फुलनार या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून माओवाद्यांनी तळ उभारल्याच्या विश्वासार्ह माहितीच्या आधारे सोमवारी अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) आणि अपर पोलिस अधीक्षक अहेरी यांच्या नेतृत्वात १८ सी-६० चे पथक आणि सीआरपीएफच्या क्यूएटीची २ पथके रवाना करण्यात आली होती. येथे ठिकाणी मंगळवारी सकाळी पोलिसांकडून घेराबंदी करण्यात आली. दिवसभरात माओवादी आणि पोलिस पथकांमध्ये गोळीबार सुरू होता. पोलिसांच्या संयुक्त पथकाने माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला असून माओवादी साहित्य आणि विविध वस्तू जप्त केल्या आहेत. या कारवाईदरम्यान सी-६० पथकाच्या महेश नागुलवार या जवानाला गोळी लागून दुखापत झाली होती. त्याला तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी हेलिकॉप्टरने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या परिसरात पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे. अधिक माहिती लवकरच कळविण्यात येईल, असे पोलिस विभागाने म्हटले आहे.

मंगळवारी गडचिरोली पोलिस दलाच्या माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान पोलिस अंमलदार महेश कवडू नागुलवार (वय ३९) नेमणूक- विशेष अभियान पथक गडचिरोली, रा. अनकोडा, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली हे जखमी झाले होते. त्यांना घटनास्थळावरून हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढून तातडीने सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान पोलिस अंमलदार महेश नागुलवार यांना वीरगती प्राप्त झाली आहे.  बुधवार (ता. १२) त्यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात त्यांचे मूळ गाव अनकोडा ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथे करण्यात येणार आहे. गडचिरोली पोलिस दल शहीद पोलिस अंमलदार महेश कवडू नागुलवार यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे गडचिरोली पोलिस विभागाने म्हटले आहे.

वृद्ध आई आणि मुलींचा आधार गेला

 

शहीद जवान महेश नागुलवार हा चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील मूळ रहिवासी आहे. वृद्ध आई, पत्नी आणि दोन मुली असा त्याचा परिवार आहे. आई एकटीच अनखोडा येथे राहते, तर महेश हा पत्नी आणि दोन मुलींसह गडचिरोलीत वास्तव्य करीत होता. २०११ च्या पोलिस भरतीत त्याची निवड झाली होती. सी-६० पथकात तो कार्यरत होता. महेशच्या निधनामुळे अनखोडा गावावर शोककळा पसरली आहे.