नागपूर विभागातून आष्टी पोलिस स्टेशनचा द्वितीय क्रमांक……अभिनंदनाचा वर्षाव

176

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कृती कार्यक्रम योजनेचा निकाल जाहीर झाला असून नागपूर विभागात पोलिस निरीक्षक संवर्गामध्ये सर्वोत्तम द्वितीय क्रमांक चामोर्शी तालुक्याीतल आष्टी पोलिस स्टेशनने पटकावला आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

१०० दिवस सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत करायच्या कामांबाबत पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सातत्याने मार्गदर्शन करून आढावा घेत पोलिस दलाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयांना, पोलिस ठाण्यांना सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने कार्यालयीन सुधारणा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक त्या सुविधा व उपाययोजना करण्याबाबत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उपविभाग स्तरावर आष्टी पोलिस स्टेशन दुसऱ्या क्रमांकावर सर्वोत्तम ठरले आहे. आष्टी पोलिस स्टेशनचे निरीक्षक विशाल काळे म्हणाले की, लोकांना पासपोर्टची सेवा शंभर टक्के वेळेत पुरवणे, चारित्र्य पडताळणी सेवा वेळेत देणे यासह स्वच्छता उपक्रम, जुने मुद्देमाल निर्गती करणे, रेकॉर्ड अद्ययावत करून जुना रेकॉर्ड नष्ट करणे यासह कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेळोवेळी प्रशिक्षण घेऊन त्यांना प्रशिक्षित करणे हे काम आम्ही या १०० दिवसांच्या आत यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवले. पोलिस स्टेशनअंतर्गत व परीसरातील वेळोवेळी स्वच्छतेला महत्त्व देऊन पोलिस स्टेशन स्वच्छ व सुंदर राहील याकडे लक्ष दिले. आष्टी पोलिस स्टेशन हे गडचिरोली जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक व उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे हे वेळोवेळी तपास कामानिमित्त आल्यानंतर त्यांचे नेहमी मार्गदर्शन मिळाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. कृती कार्यक्रम योजनेत विविध सरकारी विभागांतून गडचिरोली पोलिस विभाग बाजी मारत असल्याने या विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

————————