कारचा यू टर्न मृत्यूच्या दारात…..ट्रकची धडक बसून चौघांचा मृत्यू

296

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १८ : मृत्यू कधी कोणत्या रूपात येईल आणि एखाद्या छोट्याशा चुकीची शिक्षा किती मोठी देईल, हे सांगताच येत नाही. पुढे जाताना अचानक कारने यू टर्न घेतला तेवढ्यात पुढून भरधाव वेगात येत असलेल्या मालवाहू ट्रकने जबर धडक दिली आणि चौघांना प्राण गमवावे लागले. ही अतिशय हृदयद्रावक घटना चामोर्शी-आष्टी मुख्य मार्गावर घडली.

चामोर्शीहून आष्टीकडे जाणारी कार ग्रामीण रुग्णालयापासून काही अंतरावर चामोर्शी-आष्टी मुख्य मार्गावर असलेल्या वळणावरील तळावाजवळ यू टर्न घेत असताना आष्टीकडे जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकची धडक बसल्याने त्यात तीन जण जागीच ठार, तर एका गंभीर जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवार (ता१८) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. मृतांमध्ये विनोद काटवे, राजू नैताम, सुनील वैरागडे हे दोघेही रा. हनुमान वॉर्ड, गडचिरोली व अनिल सातपुते रा. चामोर्शी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे विनोद काटवे हे भाजपचे माजी शहराध्यक्ष मुक्तश्वर काटवे यांचे भाऊ आहेत. गडचिरोली येथील विनोद पुंजाराम काटवे (वय ४५), राजू सदाशिव नैताम (वय ४५), सुनील वैरागडे (वय ५५) रा. हनुमान वॉर्ड क्र. १० गडचिरोली हेआपल्या ECO sport कार. क्र. एमएच ३४ व्ही ०८२५ ने चमोर्शीला आल्यावर त्या का मध्ये अनिल मारोती सातपुते ( वय ५०) रा. शिवाजी चौक, चामोर्शी यांना घेऊन आष्टी मार्गाने निघाले असताना ते ग्रामीण रुग्णालयापासून काही अंतरावर असलेल्या वळणाजवळ परत चामोर्शीकडे वळण्यासाठी कारने यू टर्न घेत होते. याच दरम्यान आष् कडे जाणारा मालवाहू ट्रॅक क्र.सी.जी. ०४ एल. डब्ल्यू. ०२८४ ची कारला जबर धडक बसल्याने त्यात कारमधील तिघेजण जागीच ठार झाले, तर अनिल सातपुते हे गंभीर जखमी झाले होते. पण उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. ट्रकने कारला धडक दिल्यावर ट्रक चालकाने ट्रक घेऊन पळ काढला पण समोरच्या वळणावर ट्रक बंद पडल्याने ट्रकचालक व साथीदार ट्रॅक सोडून पळाले. घटनेची माहिती चामोर्शी पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक अमुल कादबाने, पोलिस निरीक्षक उपनिरीक्षक सुधीर बनसोडे व सहकारी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमी अनिल सातपुते यांच्यावर प्राथमिक उपचार करून गडचिरोली येथे पाठवण्यात आले. पण येथे त्यांचीही प्राणज्योत मालवली. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अमुल कादबाने यांच्या मार्गदर्शनात चामोर्शी पोलिस करत आहेत. या भीषण अपघाताच्या घटनेने समाजमन सून्न झाले आहे.