Home Gadchiroli विरोधी पक्ष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्याचे विकासाचे विरोधक माजी खासदार अशोक नेते

विरोधी पक्ष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्याचे विकासाचे विरोधक माजी खासदार अशोक नेते

161

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. २० : कोणतीही माहिती नसताना, काहीही अभ्यास नसताना काॅंग्रेससह विरोधी पक्षाचे नेते सरकारवर बिनबुडाचे आरोप लावत सुटले आहे. गडचिरोली जिल्ह्यात विकासाचे काम होत असताना विरोधी पक्ष  काही शेतकऱ्यांना दिशाभूल करून विकास कामाला विरोध करत आहेत. त्यांनी आरोपाची काडी करणे असेच सुरू ठेवल्यास मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या ईडी चौकशीची मागणी करू असा सज्जड इशाराच माजी खासदार डाॅ. अशोक नेते यांनी सोमवार १९ मे रोजी आयोजित पत्रकार परीषदेत दिला.

‘जिंदालसारख्या कंपनीला अल्प महसूलावर लोहखनिज देण्याचे षडयंत्र रचण्यात येत आहे. यातून सत्तेतील तीनही पक्षाला महिन्याकाठी प्रत्येकी ५०० कोटी रुपये अवैधपणे मिळणार असल्याचा गंभीर आरोप १७ मे २०२५ रोजी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. सोमवारी माजी खासदार डाॅ. अशोक नेते यांनी या आरोपांचे खंडन करण्यासाठी महायुतीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) व शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्यांसह पत्रकार परिषद घेत काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यापुढे असे आरोप केल्यास मुख्यमंत्र्यांकडे ईडी चौकशीची मागणी करू, असा इशारा दिला. या पत्रकार परीषदेला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, शिवसेना (शिंदे) चे सहसंपर्कप्रमुख हेमंत जंबेवार, माजी नगराध्यक्षा योगीता पिपरे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष डॉ. सोनल कोवे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, गोवर्धन चव्हाण आदी उपस्थित होते. पत्रकार परीषदेत माजी खासदार अशोक नेते यांनी विजय वडेट्टीवार यांचा नामोल्लेख केला नसला, तरी खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम यांचा थेट उल्लेख करत त्यांना धारेवर धरले. पत्रकार परीषद घेत काॅंग्रेसचे खासदार डाॅ. नामदेव किरसान यांनी अल्पदरात भूमिअधिग्रहित करणार असल्याचा आरोप केला. पण भाजपनेच भूमिअधिग्रहण कायदा आणला असून या कायद्यानुसार एखाद्या प्रकल्पासाठी जमीन संपादित केल्यास शेतकऱ्यांना बाजार भावापेक्षा  चार पट मोबदला देण्यात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्तात घेण्याचा प्रश्नच नाही. याशिवाय त्यांनी या प्रकल्पामुळे प्रदूषण वाढण्याचा धोकाही व्यक्त केला होता. पण प्रकल्प गावापासून ५०० मीटरवर स्थापन करण्याचाही नियम आहे. त्यामुळे प्रदूषणही होणार नाही.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन काँग्रेस नेते शेतकऱ्यांना भडकावण्याचे काम करत आहेत. माझ्या काळात मंजूर केलेल्या कामांचीच खासदार डॉ. नामदेव किरसान भूमिपूजने व लोकार्पण करत आहेत. गेल्या दहा वर्षांतील माझ्या खासदारकीच्या कार्यकाळात जेवढी कामे झाली तेवढी मागील ५० वर्षांत झाली नाही. त्यामुळे विद्यमान खासदारांनी बेछुट आरोप न करता वर्षभरात एक तरी प्रकल्प आणला का ते दाखवावे, असे आव्हान नेते यांनी दिले. आमच्यावर ते चंदा गोळा केल्याचा आरोप करतात पण प्रत्यक्षात हेच लोकं चंदा गोळा करत आहेत, असेही ते म्हणाले.

——————————