बिनागुंडा गावात पोलिसांनी शिताफीने पकडले पाच जहाल माओवादी

199

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २० : गडचिरोली पोलिस दल व सीआरपीएफने मंगळवारी २० मे २०२५ रोजी अबुझमाड परीसरातील बिनागुंडा गावात अतिशय कौशल्यपूर्ण कारवाई करत पाच माओवाद्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यापैकी तिघांना अटक केली असून इतर दोन माओवाद्यांच्या वयाबाबत ठोस पुरावा नसल्याने त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे.

गडचिरोली पोलिस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकूण १०३ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आले आहे. प्राप्त माहितीनुसार भामरागड उपविभागातील लाहेरी उप पोलिस स्टेशनअंतंर्गत येणाऱ्या बिनागुंडा येथे ५० ते ६० च्या संख्येने माओवादी पोलिस जवानांवर हल्ला करून घातपात घडवण्याच्या उद्देशाने एकत्र जमले असल्याचे पोलिसांना कळले. या माहितीवरून पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक सत्य साई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वात सी-६० (विशेष कृती दल) ची ८ पथके आणि ए कंपनी ३७ बटालियन सीआरपीएफचे पथक रविवार (ता. १८) या जंगल परीसरात रवाना करण्यात आले होते. सोमवारी सकाळी सी-६० पथके माओवादविरोधी अभियान राबवत असताना बिनागुंडा गावाला शिताफीने घेराबंदी करून गावामध्ये शोध घेण्यास सुरुवात केली असता काही हिरवे-काळे गणवेश परिधान केलेले व काही साध्या वेशातील हत्यारासह असलेले संशयीत व्यक्ती पोलिस पथकावर घातपात करण्याची योजना आखत असल्याचे दिसून आले. गावामध्ये सामान्य नागरिकदेखील असल्याने पोलिस पथकाने गोळीबार न करता अत्यंत शिताफीने पाच माओवाद्यांना त्यांच्याकडील हत्यारासह ताब्यात घेतले. यावेळी इतर माओवादी गावाचा व जंगल परीसराचा फायदा घेत त्या ठिकाणावरुन पळून जाण्यास यशस्वी झाले. त्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या माओवाद्यांची अधिक सखोल चौकशी करण्यासाठी पोलिस मुख्यालय गडचिरोली येथे आणले.उंगी मंगरू होयाम ऊर्फ सुमली (डीव्हीसीएम, प्लाटुन क्रमांक ३२) ( वय २८), रा. पल्ली, ता. भैरमगड, जि. बिजापूर (छ.ग.), पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी (पीपीसीएम, प्लाटुन क्रमांक ३२) ( वय १९) रा. कोंचल, ता. आवापल्ली जि. बिजापूर (छ.ग.), देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता (सदस्य, प्लाटुन क्रमांक ३२), (वय १९) रा. मारोट बाकापंचायत ता. आवापल्ली, जि. बिजापूर (छ.ग.) व इतर दोन जहाल माओवादी सदस्य असे असल्याचे उघड झाले. अधिक चौकशी दरम्यान समोर आले आहे की, या पाचही व्यक्ती सक्रिय जहाल माओवादी असून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने ते बिनागुंडा जंगल परिसरात दाखल झाले होते. यावेळी अटक करण्यात आलेल्या माओवाद्यांकडून १ एसएलआर रायफल,१ नग ३०३ रायफल, ३ सिंगल शॉट रायफल, २ भरमार बंदुका, ३ वॉकीटॉकी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या पाचही माओवाद्यांपैकी उंगी मंगरु होयाम, पल्लवी केसा मिडीयम, देवे कोसा पोडीयाम यांना मंगळवारी अटक करण्यात आली. इतर दोन माओवाद्यांच्या वयाबाबत ठोस पुरावा नसल्याने त्यांना बाल न्याय मंडळासमोर सादर करून पुढील कार्यवाहीची तजवीज ठेवण्यात आली आहे. पोलिसांच्या अभिलेखावर दाखल गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याबाबत पडताळणी सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने उंगी मंगरु होयाम ऊर्फ सुमली हिच्यावर १६ लाख, पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी हिच्यावर ८ लाख, देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता हिच्यावर ४ लाख तसेच इतर दोन माओवादी सदस्यांवर एकत्रितपणे एकूण ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.ही कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफच्या बटालियन ३७ चे कमांडंट दाओ इंजिरकान कींडो, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक सत्य साई कार्तिक, पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे व भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनात विशेष अभियान पथकाचे अधिकारी व जवान यांनी पार पाडली. यावेळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.