ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १२ : नरेंद्र मोदी हे ११ वर्षांपासून पंतप्रधानपदावर आहेत, पण ११ वर्षात त्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांतील एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मोदी व फडणवीस जे बोलतात ते कधीच करत नाहीत. स्वतःला फकीर म्हणवणारे नरेंद्र मोदी लाखो रुपये किंमतीचे जॅकेट्स, लाखो रुपयांचे कपडे वापरतात, महागड्या वस्तू वापरतात, ते योगी नाही तर सत्ताभोगी असून जनतेला दिलेली वचने पूर्ण न करणारे अधर्मी आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीतील मतचोरीची चौकशी करावी यासाठी काँग्रेस पक्षाने १२) जूनपासून राज्यभर मशाल मोर्चे काढण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार गडचिरोलीत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात मशाल मोर्चा व शेतकरी न्याय पदयात्रा काढण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, खासदार डाॅ. नामदेव किरसान, खासदार प्रतिभा धानोरकर, AICC चे सचिव व सहप्रभारी कुणाल चौधरी, माजी मंत्री अनिस अहमद, आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार सुभाष धोटे, गडचिरोली काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, आपण सतत गडचिरोलीचा दौरा करतो असा टेंभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिरवत असतात पण ते गडचिरोलीच्या विकासासाठी नाही तर सुरजागडच्या लोह खाणीतून मिळणाऱ्या मलईतून स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी येतात. स्टिल सीटी करण्याच्या नावाखाली गडचिरोलीतील शेतकरी, आदिवासी, शेतमजूर, स्थानिकांवर सुरा फिरवत आहेत. फडणवीस यांना गडचिरोलाचे फडणवीसस्थान करायचे आहे. सुरजागडच्या खाणीला विरोध करू नये म्हणून हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खाणीला विरोध करणार नाही, मोर्चात सहभागी होणार नाही असे लिहून घेतले जाते. विरोधात बातमी छापली तर कारवाई केली जाते. मुंबई ही मराठी माणसाची, कष्टकरी, गिरणी कामगारांची होती पण आज मुंबईत मराठी माणूस दुर्बिण लावून शोधावा लागतो तीच परिस्थिती गडचिरोलीची होणार आहे. प्रदुषण वाढेल, आपल्या संस्कृतीला धोका पोहचेल आणि या खाणीमुळे स्थानिक लोक हद्दपार होऊन परराज्यातील लोकांचे वास्तव्य वाढेल अशी भिती त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्षाचे नेते आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘तिघे भाऊ महाराष्ट्र लुटून खाऊ’, असे भाजप युती सरकारचे सुरू आहे. शेतकऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. कर्जमाफी देत नाहीत, कर्जमाफीसाठी पैसे नव्हते तर घोषणा का केल्या? शेतकऱ्यांशी बेईमानी करणाऱ्या महायुती सरकारला धडा शिकवावाच लागेल. लाडक्या बहिणींचा विश्वासघात केला, २१०० रुपये देण्याची घोषणा केली पण आता १५०० रुपयेही मिळणे अवघड झाले आहे, ५०० रुपये हातात टेकवत आहेत. सरकार कितीही सांगत असले तरी लाडकी बहिण योजना बंद करण्याचा त्यांचा डाव आहे. भाजप युती सरकारने शेतकरी लाडक्या बहिणींची फसवणूक केली आहे, असेur वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान आज (१२ जून २०२५) दुपारी अहमदाबाद येथून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण अपघात झाला आहे. या विमानात २४२ प्रवासी व क्रू मेंबर होते. ही घटना अत्यंत दु:खद व धक्कादायक आहे. संपूर्ण देश शोकमग्न आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आजपासून पुढचे दोन दिवस राज्यभर आयोजित केलेले मशाल मोर्चे स्थगित करून या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करावी, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना दिल्या आहेत.
———————————










