ग्लोबल गडचिरोली न्यूज ,
गडचिरोली, ता. १२ : जिल्ह्यासह शहरातील अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून ही अपघाताची मालिका थांबायचे नावच घेताना दिसत नाही. गुरुवारी १२ जून २०२५ रोजी राष्ट्रीय महामार्गाने चंद्रपूरकडून येत असलेल्या एका ट्रकचालकाने, त्याचा ट्रक अचानक अनियंत्रित झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे यांना धडक दिली. पण वेग कमी असल्याने साळवे थोडक्यात बचावले. या अपघातामुळे साळवे यांच्यासह संतप्त नागरिकांनी कारगील चौकातील मच्छी मार्केटजवळ चंद्रपूर मार्गे येणाऱ्या वाहनांना अडवून जवळपास पाऊण तास चक्काजाम केला.
गुरुवारी सकाळच्या सुमारास चंद्रपूर मार्गाने सिमेंटचा ट्रक क्रमांक एम. एच. ३४ बी. ९२८९ गडचिरोली शहरात येत होता. या ट्रकचा ड्रायव्हर हा दारू पिऊन ट्रक चालवत असल्याचे सांगितले जात आहे. या ट्रकने मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे यांना धडक दिली. यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे यांनी नेहमीच होणाऱ्या अपघाताकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे या ठिकाणी चक्काजाम केले. या मार्गावरील वाहतूक जवळपास पाऊण तास बंद झाली होती. घटनास्थळी पोलिस उशिरा पोहचले.
त्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी बळजबरीने चंद्रशेखर भडांगे, जखमी असलेले मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे त्यांचे ज्येष्ठ बंधू सेवानिवृत्त शिक्षक विजय साळवे यांना बळजबरीने उचलले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक विजय साळवे यांच्या पायाला लागले. ट्रक ड्रायवर हा नशेत असल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन ट्रक जप्त केला आहे.
————–










