ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १६ : राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार गडचिरोली येथील गीता हिंगे यांना यशवंतराव चव्हाण सभागृह ,नरिमन पॉईंट,मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, कॅबिनेट मंत्री भरत गोगावले तसेच सामाजिक विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह ,प्रमाणपत्र, राज वस्त्र तसेच ७५ हजार रुपयांचा धनादेश, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गीता हिंगे यांनी आदिवासी नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आधारविश्व फाउंडेशन ही महिलांची संस्था स्थापन करून गेल्या अनेक वर्षांपासून त्या माध्यमातून अनेक महिलांना सोबत घेऊन त्यांनी जिल्ह्यात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. महिलांचे सक्षमीकरण, किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन शिबिर, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण याविषयी समाजात जनजागृतीपर उपक्रम, आदिवासी नक्षलग्रस्त भागात जाऊन गरजूंना मदत करणे असे एक ना अनेक उपक्रम आधारविश्व फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले. कोरोना काळात कुणी चिटपाखरू बाहेर दिसत नव्हते त्यावेळी आधारविश्व फाउंडेशन गृहविलगीकरणात असलेल्या कोरोना रुग्णांचा आधार बनला. एवढेच नाहीतर ज्यांचे नातेवाईक अंतिम संस्कार करायला तयार नव्हते अशा कोरोनाने मृत झालेल्या मृतदेहाचे स्वतः महिलांना सोबत घेऊन स्मशानघाटात जाऊन त्यांच्यावर विधिवत अंतिम संस्कारदेखील केले. गडचिरोली जिल्ह्यात गीतताईंचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या प्रामाणिक, निःस्वार्थ समाजसेवेची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड केली. महाराष्ट्र शासनाने माझ्या कार्याची दखल घेऊन माझी या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल सरकारचे मनापासून आभार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान व्यक्तीच्या नावाने पुरस्कार मिळणे हे मी माझे भाग्य समजते. या पुरस्काराने माझ्या कामाची जबाबदारी अजून वाढली आहे. हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून मला या कार्यात साथ देणाऱ्या सर्व आधारविश्व फाऊंडेशनच्या सहकारी मैत्रिणींचा आहे. म्हणून मी हा पुरस्कार आधारविश्व फाउंडेशनला समर्पित करते. यापुढेही मी सर्वांना सोबत घेऊन समाजासाठी जेवढे करता येईल ते निस्वार्थ भावनेने कार्य करील, असे मनोगत गीता हिंगे यांनी व्यक्त केले. अतिशय मानाचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
———————–










