ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १६ : जिल्ह्यात दारूबंदी असली, तरी दारू, तंबाखूसोबत आता गांजा तस्करीही वाढली आहे. मोटारसायकलवर फिरून गडचिरोली शहरात वेगवेगळ्या ठिकाणी गांजा विक्री करणाऱ्या तरुणास गडचिरोली पोलिसांनी सोमवार (ता. १६) अटक केली. सागर कवडू बावणे (वय २५) रा. कोटगल ता. जि. गडचिरोली, असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार सागर बावणे हा शहरात अवैद्यपणे अंमली पदार्थाची विक्री करत असल्याच्या गोपनीय माहितीवरून गडचिरोली पोलिस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदारांनी शासकीय पंचांसमक्ष आरोपी सागर बावणेच्या ताब्यातील वाहन व राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात १३ हजार ८०० रुपये किंमतीचा गांजा (कॅनाबिलीस) वनस्पतीची फुले, १ मोटारसायकल अंदाजे किंमत ७५ हजार रुपये असा एकूण ९० हजार ७०५ किमतीचा मुद्येमाल मिळला. त्याच्याविरूद्ध गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम (एनडीपीएस) १९८५ अन्वये गडचिरोली पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोलीचे पोलिस उपनिरीक्षक दीपक चव्हाण करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक तसेच गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनात पोस्टे गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक दीपक चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक चैतन्य काटकर व अंमलदार यांनी केली आहे. गडचिरोली पोलिसांनी अमली पदार्थ विक्री करणारेया, बाळगणारे व सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. मागील काही काळात गांजा तस्करांचे प्रमाण वाढले असून मोठ्या कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.
————————————-










