वाहन चोरांची आंतरराज्यीय टोळी अखेर पोलिसांच्या ताब्यात

187

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १७ : गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या वाहन चोरीचे प्रकार वाढले असून पोलिसांनी वाहनचोरांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद केली आहे.

सावरगाव येथील पोलिस मदत केंद्रात ९ जूनु २०२५ रोजी वाहनचोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास चालू असताना साक्षीदार तसेच गोपनीय बातमीदारांच्या मदतीने सावरगाव पोलिसांनी आरोपी विनयप्रकाश धरमू कुजुर, रा. गजामेंढी ता. धानोरा जि. गडचिरोली याची ओळख पटवली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी विनयप्रकाश कुजुर याला अधिक चौकशीसाठी राजनांदगाव कारागृहामधून ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने मोटारसायकल चोरीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याबाबत कबूली दिली होती. यादरम्यान आरोपीकडे सखोल चौकशी केली असता, त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने वाहन चोरी करून चोरीच्या वाहनांची बनावट कागदपत्रे बनवून फसवणुकीने या वाहनांची विक्री करत होता, असे तपासात निष्पन्न झाले. यावरून आरोपीचे साथीदार रवनू दसरु पदा, रा. गजामेंढी ता. धानोरा जि. गडचिरोली, राकेश छबीलाल बादले रा. गजामेंढी ता. धानोरा जि. गडचिरोली, रामू झिकटुराम धुर्वे, रा. गजामेंढी ता. धानोरा जि. गडचिरोली, संजय मुन्ना लकडा रा. कवडू ता. राजपुर जि.बलरामपुर (छत्तीसगड), राजेंद्र चूंदा लकडा रा. कवडू ता. राजपुर जि.बलरामपुर (छत्तीसगड), राजेश पुरुषोत्तम सोनकुसरे रा. तळेगाव ता. कुरखेडा जि. गडचिरोली यांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली. आरोपींना न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने आरोपी विनयप्रकाश कुजुर याच्यासह सर्व ७ आरोपींना २० जून २०२५ पर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे. या सखोल चौकशीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील मुरूमगाव पोलिस स्टेशन, कोरची पोलिस स्टेशन, आरमोरी पोलिस स्टेशन, पुराडा पोलिस स्टेशन, कोटगुल पोलिस स्टेशन, धानोरा पोलिस स्टेशन तसेच छत्तीसगड येथे दाखल एकूण १४ गुन्हे उघडकीस आले. गडचिरोलीसह छत्तीसगड येथील एकूण ४२ दुचाकी वाहनांचा शोघ घेण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. याबरोबरच तपासाअंती अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गुन्ह्यांचा पुढील तपास सावरगाव पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक विश्वंभर कराळे करत आहेत. हा तपास पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक तसेच धानोराचे उपविभागीय पोलिस अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) रवींद्र भासले यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरूण फेगडे, सहायक पोलिस निरीक्षक भगतसिंग दुलत, सावरगाव येथील पोलिस उपनिरीक्षक विश्वंभर कराळे, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कोळेकर, महिला पोलिस उपनिरीक्षक सिद्धेश्वरी राऊत व गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखा आणि सावरगाव पोलिस मदत केंद्राच्या अंमलदारांनी पार पाडली.

——————————–