ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २७ : सगळी संकटे, विघ्नांना दूर करणारा श्रीगणेश भक्तांच्या घरी येत असताना गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचे विघ्न दूर करण्यासंदर्भात एक पाऊल पुढे टाकत माओवाद्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. कोपर्शी जंगल परीसरात झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांनी चार जहाल माओवाद्यांना कंठस्नान घातले. मृत माओवाद्यांमध्ये एक पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.
गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात मंगळवारी गडचिरोली विभागाचे गट्टा दलम, कंपनी क्रमांक १० व इतर माओवादी दबा धरून बसले असल्याची विश्वासार्ह गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांच्या नेतृत्वात सी-६० ची १९ पथके आणि CRPF QAT ची २ पथके या जंगल परिसरात रवाना करण्यात आली होती. या भागात सुरू असणाऱ्या प्रचंड पावसादरम्यान दोन दिवसानंतर पोलिस पथके बुधवार (ता. २५) सकाळी या जंगल परिसरात पोहोचून शोध मोहीम राबवत असताना माओवाद्यांनी पोलिस पथकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्याला पोलिस पथकाने प्रभावी प्रत्युत्तर दिले. सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर या परिसरात शोध घेतला असता एकूण ४ जहाल माओवाद्यांचे मृतदेह (१ पुरुष आणि ३ महिला) आढळून आले आहेत. याशिवाय घटनास्थळावरून १ SLR रायफल, २ INSAS रायफल व १ 303 रायफल जप्त करण्यात आले आहेत. या भागात उर्वरित माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी माओवाद विरोधी अभियान सुरू आहे. मृत माओवाद्यांची नावे वृत्त लिहीपर्यंत कळलेली नाहीत. मात्र मारले गेलेले माओवादी मोठे नेते असल्याची चर्चा सुरू आहे.
———————————-










