ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ३० : शहरातील वाढती अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग व प्रशासनातील हलगर्जीपणा याबाबत आक्रमक भूमिका घेत गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निबोंरकर व नगरसेवक सागर निंबोरकर यांनी शहरातील विविध भागांची स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान आढळून आलेल्या अस्वच्छतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना तत्काळ कचरा साफसफाई करण्याचे व शहर स्वच्छ ठेवण्याचे कडक निर्देश दिले.
नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निबोंरकर व नगरसेवक सागर निबोंरकर यांनी इंदिरा गांधी चौक, कॉम्प्लेक्स परिसर, चामोर्शी रोड, आरमोरी रोड, धानोरा रोड तसेच शहरातील प्रमुख मार्ग, बाजारपेठा आणि वसाहतींची पाहणी केली. या पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी कचरा साचलेला, नाल्यांची योग्य सफाई न झालेली, रस्त्याच्या कडेला टाकलेला कचरा व दुर्गंधी पसरलेली असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. ही परिस्थिती पाहून नगराध्यक्ष अॅड. निंबोरकर संतप्त झाल्या. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. “गडचिरोली हे माझे शहर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गडचिरोली सुजलाम-सुफलाम करण्याचे स्वप्न आहे. माझ्या शहरात अस्वच्छता खपवून घेतली जाणार नाही. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे ठणकावून सांगत त्यांनी तत्काळ विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश दिले. साफसफाईच्या कामात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. कचरा वेळेवर उचलणे, रस्ते व नाले स्वच्छ ठेवणे, शहरातील प्रत्येक प्रभागात नियमित स्वच्छता करणे ही जबाबदारी नगर परीषद प्रशासनाने गांभीर्याने पार पाडावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. नगराध्यक्षांच्या या पाहणीमुळे नगर परीषद प्रशासनात खळबळ उडाली असून तत्काळ साफसफाईच्या कामाला वेग देण्यात आला आहे. शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी करण्यासाठी आपण स्वतः मैदानात उतरल्याचे नगराध्यक्ष निबोंरकर यांनी यावेळी दाखवून दिले. या पाहणीवेळी नगर परिषद मुख्याधिकारी पिदुरकर, नगरसेवक सागर निबोंरकर, रेखा डोळस, जे.ई. खामनकर तसेच नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. नगराध्यक्ष प्रणोती सागर निबोंरकर व नगरसेवक सागर निंबोरकर यांच्या या आक्रमक व लोकाभिमुख भूमिकेमुळे शहरातील स्वच्छतेला निश्चितच चालना मिळणार असून, नागरिकांमध्ये समाधान व सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.
———————————————-










