लांझेडा येथे पुरातन महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्साहात साजरी

67

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता .१८ : लांझेडा येथील पुरातन महादेव मंदिरात महाशिवरात्र निमित्त भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक उत्साहाचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला. रविवारी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.

पहाटे काकड आरतीने कार्यक्रमाची मंगल सुरुवात झाली. . भाविकांनी मोठ्या श्रद्धेने भगवान शंकराचे दर्शन घेतले. दिवसभर मंदिरात भक्तांची अखंड रांग लागलेली दिसून आली.

महिला मंडळ व स्थानिक भजन मंडळांच्या वतीने अखंड भजन, कीर्तन तसेच शिवमहिम्न स्तोत्र पठण करण्यात आले. युवकांनी ढोल-ताशांच्या गजरात महादेवाच्या नावाचा जयघोष करत वातावरण अधिक भक्तिमय केले. संध्याकाळी झालेल्या महाआरतीवेळी शेकडो भाविकांनी एकत्र येत भक्तिभावाने आरती केली. . सोमवारी सायंकाळी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. महाप्रसादासाठी भक्तांची प्रचंड गर्दी उसळली होती. आयोजक समितीने शिस्तबद्ध नियोजन करून सर्वांना महाप्रसादाचे वितरण केले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महिला, युवक आणि बाल मंडळातील स्वयंसेवकांनी व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

अनेकांनी उपवास, जप-तप आणि रात्रजागरण करून शिवभक्तीचा अनुभव घेतला.संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ, तरुण मंडळ, महिला मंडळ, बाल मंडळ आणि मंदिर समितीने विशेष सहकार्य केले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे महाशिवरात्र उत्सव अत्यंत उत्साहात आणि शांततेत पार पडला.

या भक्तिमय सोहळ्यास नगरपरिषद शिक्षण सभापती तथा प्रभागाचे नगरसेवक हर्षल गेडाम व नगरसेविका कोमल नैताम यांनी उपस्थित राहून भगवान महादेवाचे दर्शन घेतले व महाआरतीत सहभाग नोंदविला. त्यांनी मंदिर समितीच्या कार्याचे कौतुक करत सर्व भाविकांना महाशिवरात्रच्या शुभेच्छा दिल्या.

महाशिवरात्र उत्सवामुळे लांझेडा परिसरात भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक उर्जेचे मंगलमय वातावरण निर्माण झाले .