खाकी वर्दी धारण करण्याचे तरुणाचे स्वप्न मृत्यूने हिरावले

148

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता.६ : पोलिस होण्याचे स्वप्न डोळ्यांत साठवून राज्य राखीव पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वडसा येथे घडली. आशिष म्हशाखेत्री (रा. देलोडा, ता. जि. गडचिरोली) असे मृत तरुणाचे नाव आहे.

विसोरा येथील एसआरपीएफ कॅम्प परिसरात सध्या पोलिस भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीत आशिष मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता. पोलिस दलात भरती होऊन कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्याची त्याची तीव्र इच्छा होती. मात्र, भरतीदरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, आशिषने यंदाच्या गडचिरोली पोलिस भरतीसाठीही प्रयत्न केले होते आणि त्यामध्ये त्याने चांगले गुणही मिळवले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या मेहनतीला यश मिळण्याच्या उंबरठ्यावर असतानाच नियतीने घाला घातल्याने त्याचे पोलिस होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. आशिष हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याची माहिती समोर येत असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

——————————————————