ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली (Gadchiroli), ता. १३ ; जिल्हा परीषदेचा शिक्षण विभाग, शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे तसेच आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर प्रणित आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या सौजन्याने आरमोरी येथील मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित आनंदानुभूती शिबिराच्या माध्यमातून शिक्षकांनी योगविद्येचे धडे घेतले.
६ ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत ‘आनंदानुभूती शिबिर (Happiness Program)’ अंतर्गत आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये अनेक मनोकायिक आजारांवर प्रभावी जगप्रसिद्ध सुदर्शन क्रिया, तणावमुक्त जीवनशैली, मानसिक शांतता आणि आरोग्यवर्धक तंत्रांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. शिबिरासाठी संध्याकाळी ४ ते ७ वाजता या वेळेत योग सत्रांचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योग शिक्षिका अंजली कुळमेथे आणि धनंजय पत्रे यांनी उपस्थित शिक्षकांना सुदर्शन क्रियेचे तसेच विविध योग-प्राणायामांचे प्रशिक्षण दिले.
या प्रशिक्षणात ओंकार, वज्रासन, उज्जायी (थ्री-स्टेज) प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम यांचा समावेश होता. तसेच उपस्थित प्रत्येकामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी नोटबुक व पेनच्या माध्यमातून केलेल्या कृती, मनोरंजक खेळ, तसेच प्रत्येकाने एकमेकांशी संवाद साधण्याच्या उपक्रमांमुळे सर्वांचे मन प्रफुल्लित झाले. या प्रक्रियेत प्रत्येकाने प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आणि प्रशिक्षणाचे वातावरण उत्साही व आनंददायी बनले.
उपस्थितांमध्ये आरमोरी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख राजेश वडपल्लीवार,म. गांधी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य साईनाथ अद्दलवार, श्रीपाद वठे, कृष्णा खरकाटे, उप. मुख्याध्यापक विरेंद्र गुंफावार, निमजे, गोंडाने, गुरनुले, खरवडे, चट्टे, आत्राम, गुरनुले, रोटके आदींचा समावेश होता. या शिबिरासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.
————————————-










