आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे लोकसभेची मोठी जबाबदारी

169

गडचिरोली, ता. ३० : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी रात्रंदिवस संपूर्ण लोकसभा क्षेत्रात झंझावाती दौरा करत प्रचंड परीश्रमाने प्रचार करणारे व सोबतच पक्ष संघटनही कौशल्याने मजबूत करणारे आमदार डाॅ. देवराव होळी यांना पक्षश्रेष्ठींनी लोकसभेची आणखी मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांना लातूर येथील निलंगा विधानसभा क्षेत्राचा पक्ष निरीक्षक म्हणून नेमण्यात आले असून आमदार डाॅ. होळी ही जबाबदारी सांभाळण्यासाठी लातूरला रवाना झाले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशावरून लातूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवाराच्या प्रचारार्थ निलंगा विधानसभा क्षेत्रात निरीक्षक म्हणून आमदार डॉ. देवराव होळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपली जबाबदारी परीश्रमाने पार पाडून लातूर लोकसभेत विजयाचे कमळ फुलविण्यासाठी आमदार डाॅ. होळी लातूरला रवाना झाले. लातूर लोकसभा क्षेत्रात जाताना त्यांनी तेलंगणा राज्यातील बासर येथील सुप्रसिद्ध सरस्वती मातेच्या मंदिराचे दर्शन घेऊन लातूर लोकसभा क्षेत्रातील निलंगा विधानसभा क्षेत्राकडे प्रस्थान केले. लातूर लोकसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत तिथे ते पूर्ण वेळ उपस्थित राहून उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहेत.