कोरची तालुक्यात हिवतापाने बालिकेचा मृत्यू

175

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

कोरची, ता. ८ : गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील आलोंडी येथील एका नऊ वर्षीय बालिकेचा हिवतापाने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आरती करणसाय कुंजाम असे मृत बालिकेचे नाव आहे.

आरतीला ताप येत असल्याने तिला ३१ मे रोजी कोटगूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तपासणीअंती चाचणी मलेरिया पॉझिटीव्ह आली. डॉ. रंगारी आणि डॉ. नाकाडे यांनी तिच्यावर उपचार केले. परंतु लगेच आरतीला झटके येऊ लागल्याने तिला कोरचीला रेफर करण्यात आले. परंतु कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयातून रुग्णांना बरेचदा गडचिरोलीला रेफर करण्यात येते, ही बाब माहिती असल्याने पालक तिला वासळी येथील खासगी डॉक्टरकडे घेऊन गेले. परंतु प्रकृतीत सुधारणा न होता ३ जूनला आरतीचा मृत्यू झाला.

कोटगूल परिसरात हिवतापाच्या आजाराने अनेक नागरिक फणफणत असून, मागील दोन महिन्यांत चार जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी कोटगूलपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील गोडरी येथील एकाच कुटुंबातील करिश्मा नैताम (वय ६) व प्रमोद नैताम (वय ४) या दोन चिमुकल्या भावंडांचा हिवतापाने मृत्यू झाला. त्यानंतर लेकुरबोडी येथील रामबाई गावडे ही महिला १७ एप्रिलला दगावली होती. आता जूनच्या प्रारंभी बालिकेचा मृत्यू झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर संताप व्यक्त होत आहे.