ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली,ता. २४ : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अनेक तस्कर मोठ्या प्रमाणात दारूतस्करी करत असतात. त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाने आक्रमक पवित्रा घेत कंबर कसली असून विविध ठिकाणी छापे मारत वाहनांसह अवैध दारूचा एकूण ३३ लाख २२ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अहेरी तालुक्यातील दामरंचा उप पोलिस स्टेशन हद्दीतील माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील नैनगुंडम या गावात २३ जून रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान गोपनीय बातमीदारांकडून पोलिसांना माहिती मिळाली. रेपनपल्ली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कमलापुर येथे राहणारा पुरुषोत्तम हनमलवार याने नैनगुंडम गावातील त्याचा साथीदार संतोष भिमा सिडाम व गणेश सालय्या आलाम यांच्या मदतीने संतोष सिडामच्या घरी अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात देशी दारू व काळ्या गुळाची साठवणूक करून ठेवल्याची खात्रिशीर माहिती प्राप्त झाली. या माहितीवरून संतोष सिडामच्या घरी छापा मारला असता त्याच्या घरात देशी दारूच्या १४२ पेट्या किंमत ११ लाख ३६ हजार रुपये, काळ्या गुळाच्या ७५ पेट्या किंमत ९० हजार रुपये, असा एकुण १२ लाख २६ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. तसेच संतोष सिडाम व गणेश आलाम यांना ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी पुरुषोत्तम हनमलवार फरार आहे. यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातून अहेरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या दारूतस्करी होत असल्याची माहिती अहेरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बोटलाचेरू गावाजवळ सापळा रचून संशयीत वाहन थांबवून झडती घेतली. त्यात रॉयल स्टॅग विदेशी दारूच्या ६ पेट्या किंमत १ लाख ८ हजार , रॉकेट संत्रा देशी दारूच्या ४ पेट्या किंमत ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाहनचालक मोहम्मद इलीयास शेख रा. बालाजी वाॅर्ड, चंद्रपूर याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने किशोर सूर्यभान डांगरे रा. आलापल्ली याला दारूचा पुरवठा करत असल्याचे सांगितले. आरोपींकडून देशी-विदेशी दारू, मोबाईल व टाटा व्हीस्टा वाहन क्र. एच एच ३३ ए ३७९३ वाहनासह एकूण ४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच २४ जून रोजी रात्री अहेरी येथील पोलिस पथक रात्रीची गस्त घालत असताना रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका संशयित महिंद्रा पिकअप वाहन क्र. एम एच ३८ एक्स ३०५५ चा चालक पोलिसांना पाहून पळून गेला. या वाहनाची तपासणी केली असता त्यात रॉकेट संत्रा देशी दारूच्या ६८ पेट्या किंमत ४ लाख ७६ हजार आढळल्या. वाहनासह एकूण १० लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोमवारीच रेपनपल्ली उप पोलिस स्टेशनच्या हद्दीतील लिंगमपल्ली गावाजवळील लिंगमपल्ली टोला येथे अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अहेरी (प्राणहिता) चे अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने छापा टाकला असता गंगाराम बकय्या नेरला व नागेश सोमा नेरला दोघेही रा. लिंगमपल्ली ता. अहेरी हे अवैध दारूविक्री करताना आढळून आल्याने त्यांच्या ताब्यातून आयएमएफएल विदेशी दारूचे ३८ बॉक्स व देशी दारूच्या २० पेट्या असे एकूण ५८ बॉक्स अंदाजे किंमत ५ लाख ८३हजार १७० रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला व दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या विविध कारवाया पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनात अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे, स्थानिक गुन्हे शाखेचे उल्हास भुसारी, अहेरीचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे, सहायक पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड, पोलिस उपनिरीक्षक राजू गवळी, पोलिस उपनिरीक्षक विजय सपकाळ, पोलिस उपनिरीक्षक सरीता मरकाम, पोलिस उपनिरीक्षक करुणा मोरे, परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक संकेत सानप व त्यांच्या पथकातील पोलिस जवानांनी केली आहे. पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईने दारूतस्करांचे धाबे दणाणले आहे.









