- गडचिरोली, ता. ११ : गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम असला तरी येथे अनेक मोठ्या नद्या आहेत. येथे समृद्धी आणायला समुद्र आणू शकत नाही. पण इथल्या नद्यांना जोडून वाॅटर वे (जलमार्ग) तयार करण्याच्या कामाला आम्ही लागोल आहोत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

- महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या आलापल्ली येथील प्रचार सभेत ते बोलत होते. या प्रचार सभेला राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, शिवसेनेचे राकेश बेलसरे, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवी वासेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, प्रकाश गेडाम, माजी जिल्हा परीषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, शिवसेनेच्या वर्षा मोरे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ऋतुराज हलगेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील नद्यांचा वाहतुकीसाठी उपयोग होईल काय, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. केंद्र सरकारच्या माध्यमातून एका कंपनीशी बोलणे सुरू झाले आहे. लवकरच येथे जलमार्गाने वाहतूक सुरू होईल. त्यामुळे गडचिरोली जिल्हा रस्त्याने, रेल्वेने, विमानाने आणि जलमार्गाच्या माध्यमातून जहाजानेही जोडला जाईल. येथील साहित्य जलमार्गे जगभरात नेता येईल, उद्योग वाढेल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. २०१३ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत भारत ११ व्या क्रमांकावर होता. पण अवघ्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था केली. आता पुन्हा सरकार आल्यावर त्यांच्या नेतृत्वात भारत क्रमांक एकची अर्थव्यवस्था होईल. त्यासाठी महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांना विजयी करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
- या सभेला महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- ——————————–









