आरमोरी, ता. १७ : लग्न झाल्यावर नववधू संसारात मग्न होते. पण लग्नाला अवघे ११ दिवस होत नाहीत तोच एका विवाहितेने अचानक आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मृत विवाहितेचे नाव मोनाली जगदीश ढोरे (वय २२) असून ही घटना १६ एप्रिल रोजी घडली. तालुक्यातील शिवणी (बुज.) येथील जगदीश ढोरे यांचा विवाह भंडारा जिल्ह्यातील गौराळा येथील मोनाली संजय शहारे यांच्याशी ५ एप्रिल रोजी झाला होता. शिवणी येथील जगदीशच्या घरी नातलगांच्या उपस्थितीत दोघांनी लग्न केले. लग्नसमारंभानंतर मोनाली सासूरवाडीत शिवणी येथे आली होती. पण लग्नाच्या ११व्या दिवशीच तिने घराच्या आढ्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलिस करत आहेत.
——————————









