ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १२ : भामरागड तालुक्यातील निसर्गरम्य बिनागुंडातील राजीरप्पी धबधबा दोघांसाठी मृत्यूचे द्वार ठरला आहे. विशेष म्हणजे या धबधब्यात बुडालेल्या युवकाचे चार दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. येथे कुटुंबासह सहलीला गेलेल्या दोघांचा येथील राजीरप्पी धबधब्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवार (ता. ११) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. बादल श्यामराव हेमके (वय ३९), रा. आरमोरी आणि नवनीत राजेंद्र धात्रक (वय २७) रा. चंद्रपूर, अशी मृतांची नावे आहेत.
नवनीत धात्रक हा बादल हेमके यांचा जवळचा नातेवाईक आहेत. हेमके हे भामरागड तालुक्यातील पल्ली ग्रामपंचायतीचे ग्रामसवेक होते. ते भामरागड येथे वास्तव्याने होते. ७ जूनला नवनीतचे लग्न झाले. त्यानंतर तो पत्नीसह हेमके यांच्या घरी गेला. मंगळवारी दोघांचेही कुटुंबीय बिनागुंडा येथील राजीरप्पी धबधबा पाहण्यासाठी गेले. त्यावेळी नवनीत आंघोळीसाठी पाण्यात उतरला. मात्र तो खोल पाण्यात बुडाला. त्याला वाचविण्यासाठी हेमके मदतीला धावले. मात्र, दोघांनाही पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. दोघांच्याही कुटुंबीयांच्या समक्ष ही हृदयद्रावक घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लाहेरी येथील पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह भामरागड येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. लग्नाला चार दिवस होत नाही; तोच पतीचे निधन झाल्यामुळे पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुखी संसाराचे स्वप्न रंगवणाऱ्या नववधुच्या नशिबी लग्नाच्या अवघ्या चार दिवसांनीच वैधव्य आले आहे.
—









