प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांना रशिया येथील परिषदेचे आमंत्रण

93

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ११ : उच्च शिक्षणासंदर्भांतील धोरण व मुल्यमापन या क्षेत्रात जागतिक स्तरावरील अग्रगण्य असलेल्या व युनेस्कोशी जोडल्या गेलेल्या APQN ( Asia Pacific Quality Network ) या संस्थेची जागतिक वार्षिक परिषद यावर्षी रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथे २६ ते २९ सप्टेंबर २०२४ या काळात पार पडणार आहे. या अत्यंत महत्वाच्या परिषदेसाठी प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांची निवड झाल्याचे पत्र रशिया रजिष्टर यांच्याकडून प्राप्त झाले आहे.

या परिषदेला जगभरातील १०० शिक्षणतज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत जागतिक स्तरावरील उच्च शिक्षणाच्या सद्य:स्थितीवर विचार मंथन होणार आहे. ‘ The Quality Assurance and Global Tertiary Education, Navigating Challenges and Embracing Innovation’ या विषयावर जगभरातील शिक्षणतज्ज्ञाचे विचारमंथन आयोजित केले आहे. या परिषदेला प्राचार्य डॉ. मुनघाटे उपस्थित राहून भारतातल्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या वाटचालीबद्दल आपले सादरीकरण करणार आहेत.जागतिक APQN स्तरावरील क्षेत्रात धोरणात्मक व गुणवत्ता यावर संशोधनपर कार्य करणाऱ्या जागतिक संस्थेचे कायमस्वरूपी सदस्य म्हणून प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे हे गेल्या १० वर्षांपासून जुळलेले आहेच. या आधी प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी युनेस्कोच्या उच्च शिक्षणासंदर्भातील अनेक महत्त्वाच्या चीन, दुबई, सिंगापूर, श्रीलंका, पॅरीस, रोम, मलेशिया व थायलंड या देशांच्या जागतिक परिषदेत उपस्थित राहून संशोधन पत्राचे सादरीकरण केले आहे. प्राचार्य डॉ. मुनघाटे हे नागपूर व गोंडवाना विद्यापीठाच्या सर्वच प्राधिकरणाचे सदस्य राहीले असून बालभारती अभ्यास मंडळावर, भारतातील अनेक शासकीय परिक्षा मंडळांवर, युनेस्कोच्या अनेक समित्यांवर व नॅकच्या मूल्यांकनाच्या प्रक्रियेत सदस्य म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. १० वर्षांआधी अमेरिकेच्या रॉकफेलर फाउंडेशनचा महाविद्यालयीन तरुणांच्या तंबाखू सेवन विषयावरील शोधप्रकल्प यश्स्वीरीत्या पूर्ण केला आहे. या निवडीबद्दल प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे.

————————————–