चिमुकलीचे प्राण वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचाच झाला मृत्यू

181

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

गडचिरोली, ता. ११ : सर्पदंश झाल्यामुळे अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या चिमुकलीला उपचारासाठी दुचाकीवर घेऊन निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्याने या अपघातात त्याचाच मृत्यू झाला व इतर दोघे जखमी झाले. ही घटना १० आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान गडचिरोलीपासून ७ किमी अंतरावर असलेल्या चांदाळा वळणावर घडली. राकेश किरंगे (वय २७) रा. चांदाळा (टोली) असे मृताचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार रानमुल येथील एका मुलीला साप चावला होता. ही मुलगी राकेश किरंगेची नातलग आहे. तिचे प्राण वाचावे म्हणून राकेश किरंगे तिला दुचाकीने गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालय उपचारासाठी नेत होता. यावेळी गोरे नामक व्यक्ती आपल्या कुटुंबासह कार क्रमांक एमएच ३१- सीआर ३०५३ ने चादांळाच्या पुढे जात असताना वळणावर कारची दुचाकीला धडक बसली. ही धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकीचे पुढचे चाक निखळून पडले आणि कारच्या पुढच्या भागाचा चेदामेंदा झाला. यात राकेशचा जागीच मृत्यू झाला. पण त्याच्या दुचाकीवर बसलेली महिला व सर्पदंश झालेली मुलगी दोघेही सुदैवाने वाचले आहेत. शिवाय कारमधील गोरे परीवाराचे सदस्यही बचावले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात पाठवले. या घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलिस स्टेशनचे ठाणेदार सिंजनजुडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

——————————–