मोफत आरोग्य शिबिरासह ५४८ नागरिकांना लाभ
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ८ : तालुक्यातील देवापुर ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तसेच ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ या उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबिर व विविध शासकीय योजनांच्या विशेष कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी भूषविले. प्रमुख उपस्थितीत कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे, मत्स्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. डोंगरे, सरपंच शिवाजी गावडे, ग्रामसेवक संजय नैताम यांच्यासह सुधाकर दुगा, विलास पोटावी, दिनेश किरंगे आदी मान्यवर उपस्थित होते. परिसरातील नऊ गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमादरम्यान गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. देवापुरला आदर्श गाव म्हणून विकसित करण्यासाठी विविध नियोजनबद्ध उपक्रम राबविण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
अभियानांतर्गत विविध विभागांकडून महत्त्वपूर्ण उपक्रमांची घोषणा करण्यात आली. कौशल्य विकास विभागामार्फत १८ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण व त्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. समाज कल्याण विभागामार्फत गावात अद्ययावत वाचनालय उभारण्यात येणार असून महिलांसाठी मासिक पाळीदरम्यान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मावा आसकंना लोन’ उभारले जाणार आहे. तसेच मत्स्य विकास विभागामार्फत तलावांचे खोलीकरण व मत्स्य व्यवसायिकांना मोफत विमा संरक्षण देण्याची योजना राबविण्यात येणार आहे.
मोफत आरोग्य शिबिरात एकूण ५४८ नागरिकांनी लाभ घेतला. यामध्ये ४५ नागरिकांची आयुष्मान भारत कार्डे काढण्यात आली, तर २२ जणांची ‘वय वंदन’ योजनेअंतर्गत नोंदणी करण्यात आली. शिबिरात महिला, बालके, गर्भवती माता, डोळ्यांचे आजार तसेच सिकलसेल तपासणीसह विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या.
या शिबिरात डॉ. प्रियंका शेडमाके, डॉ. आशीष शेडमाके, डॉ. मनोहर मडावी, डॉ. नितीन मसराम, डॉ. उईके (प्राथमिक आरोग्य केंद्र, पोटेगाव), डॉ. लालाजी वट्टी व डॉ. शानगोंडा यांनी वैद्यकीय सेवा दिली. तसेच आरोग्यमित्र नेहाल भानारकर व संतोष कुकडकर यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.










